टिपणीवर मनपा आयुक्तांची स्वाक्षरी
By Admin | Updated: July 17, 2014 15:06 IST2014-07-17T15:06:12+5:302014-07-17T15:06:12+5:30
अनधिकृतपणे शाळा चालविल्या प्रकरणी प्रशासन अधिकार्यांनी संबंधित संस्थेचे अध्यक्ष इक्बाल शेख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या टिपणीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी स्वाक्षरी केली.

टिपणीवर मनपा आयुक्तांची स्वाक्षरी
जळगाव : अनधिकृतपणे शाळा चालविल्या प्रकरणी प्रशासन अधिकार्यांनी संबंधित संस्थेचे अध्यक्ष इक्बाल शेख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची टिपणी सोमवारी दिल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी टिपणीवर स्वाक्षरी केली. त्यामुळे इक्बाल शेख यांच्यावर आज गुन्हा दाखल होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेहरूण भागातील गणेशपुरी परिसरात गेल्या आठ वर्षापासून इक्बाल शेख अनधिकृतपणे शाळा चालवत आहे. आरटीईनुसार शाळेला मान्यता घ्यावी, याबाबत मनपा शिक्षण मंडळातर्फे त्यांना तीनदा नोटीस पाठविण्यात आली. तरीही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिक्षण मंडळाने शेख यांना दिलेल्या अंतिम नोटिसीत दंडात्मक कारवाई करण्यात येईल; असे म्हटल्यानंतर त्यांनी सोमवारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाधिकारी एस. डी. पाटील (प्राथमिक) यांनी शेख यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर विद्यार्थी व पालकांची दिशाभूल झाल्याचे समोर आले. त्यामुळे शिक्षणाधिकार्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश प्रशासन अधिकार्यांना दिले. त्याच दिवशी प्रशासन अधिकारी महाजन यांनी आयुक्तांना टिपणी सादर केली. या टिपणीवर आयुक्तांनी बुधवारी सही केली आहे.
दरम्यान, मंगळवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस कामानिमित्त बाहेर असल्यामुळे प्रशासन अधिकार्यांनी उपायुक्त अविनाश गांगुर्डे यांच्याकडे टिपणी सादर केली होती. मात्र त्यावर सही होऊ शकली नव्हती.
-----------------