बाप्पाला निरोप देण्यासाठी भुसावळात पालिका व पोलीस प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST2021-09-17T04:21:20+5:302021-09-17T04:21:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी व कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, नदीमध्ये प्रदूषण ...

बाप्पाला निरोप देण्यासाठी भुसावळात पालिका व पोलीस प्रशासन सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी व कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, नदीमध्ये प्रदूषण थांबावे या उद्देशातून पालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. राहुलनगर व रेल्वे फिल्टर हाउसजवळील तापी नदी पात्रात विसर्जनासाठी पालिका प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
भुसावळला १२ रोजी १० वर्षीय मुलीचा पाय घसरून दुर्दैवी अंत झाला होता. ही घटना डोळ्यासमोर ठेवून यापुढे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांततेत बाप्पाला निरोप देता यावा याकरिता पालिका व पोलीस प्रशासनातर्फे तापी नदी पात्राजवळ ब्राह्मण, जीवरक्षक, पोलीस व पालिका अधिकारी तसेच कर्मचारी यांचा ताफा तळ ठोकून राहणार आहे. याशिवाय नदीपात्रात कुठलेही प्रदूषण होऊ नये याकरिता निर्माल्य संकलनासाठी ट्रॉलीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
राहुलनगरजवळील तापी पात्रात असा राहणार बंदोबस्त
राहुलनगरजवळील महादेव मंदिर घाट हा पूर्णत: बंद असेल. येथे कोणासही जाण्यास परवानगी नाही. तेथे पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. याशिवाय राहुलनगरजवळील ज्या ठिकाणी विसर्जनासाठी परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी ५० जीवरक्षक, १० नगरपालिका कर्मचारी, पाच अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित राहतील. मूर्तीशिवाय तापी पात्रात काहीही टाकता येणार नाही. निर्माल्य टाकण्यासाठी दोन ट्रॉलींची व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे फिल्टर हाउस
एकाच वेळेस राहुलनगर तापी पात्रात गर्दी होऊ नये याकरिता रेल्वे फिल्टर हाउसच्या भागातील नागरिकांसाठी त्या ठिकाणी प्रशासनातर्फे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी एक पुरोहित, १० जीवरक्षक, १० पोलीस, नगरपालिका व पालिका अधिकारी कर्मचारी हे उपस्थित राहणार आहेत.
लहान मुलांना ‘नो एन्ट्री’
पालकांनी श्री विसर्जन करतेवेळी लहान मुलांना मुळीच आणू नये, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.