बहुसदस्य प्रभाग पद्धतीमुळे मिळतो काम केल्याचा आनंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:43+5:302021-09-24T04:18:43+5:30
चाळीसगाव : महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्याने या वर्षअखेरीस व पुढीलवर्षीदेखील रणधुमाळी रंगणार आहे. बुधवारी ...

बहुसदस्य प्रभाग पद्धतीमुळे मिळतो काम केल्याचा आनंद !
चाळीसगाव : महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्याने या वर्षअखेरीस व पुढीलवर्षीदेखील रणधुमाळी रंगणार आहे. बुधवारी राज्य सरकारने पालिका निवडणुकांसाठी बहुसदस्य प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. एकेरी वाॕर्ड रचना ते बहुसदस्य प्रभाग राज्य सरकारच्या निर्णयांचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. वाॕर्ड रचनेत काम करायला मर्यादा येतात. बहुसदस्य प्रभाग रचनेमुळे काम केल्याचा आनंद मिळतो, असा सूर आजी-माजी सदस्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
मध्यंतरी महाविकास आघाडी, महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत घेतलेल्या बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय फिरवत पुन्हा वाॕर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. मात्र बुधवारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत वाॕर्ड रचनेचा निर्णय मागे घेऊन बहुसदस्य प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामुळे होऊ घातलेली पालिकेची निवडणूक ही गत प्रभाग पद्धतीनुसारच होणार आहे. एका प्रभागात दोन सदस्य असणार आहे.
चौकट
असे बदललेले प्रभाग रचनेचे धोरण
-२००१ महामापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगराध्यक्षांची जनतेतून निवड. विलासराव देशमुख सरकारचा निर्णय
-२००६ बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द. पुन्हा एकेरी वाॕर्ड रचना. विलासराव देशमुख सरकारने आधीचा निर्णय बदलला
-२०११ महामालिकांमध्ये दोन तर न. प. मध्ये चार सदस्यीय प्रभाग. पृथ्वीराज चव्हाण सरकारचा निर्णय
-२०१६ महानगर पालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग तर नगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग. यासोबतच नगराध्यक्षाची थेट निवडणूक देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय.
-२०१९ महानगरपालिका, नगरपालिकांसाठी एकेरी वाॕर्ड पद्धत उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय.
-२०२१ महानगरपालिकांसाठी तीन तर नगरपालिकांसाठी दोन बहुसदस्यीय प्रभाग पद्धती. उद्धव ठाकरे सरकारने आपला आधीचा निर्णय बदलला.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धत स्त्री-पुरुष समानता साधत असली तरी, प्रभागाला न्याय देण्यासाठी वाॕर्ड रचनाच योग्य आहे. यामुळे खरोखर काम करणारा सदस्य ओळखता येतो. बहुसदस्यीय प्रभाग रचनेत श्रेय घेण्याची चढाओढ निर्माण होते. एकेरी वाॕर्ड पद्धतीत नागरिक थेटपणे नगरसेवकाला जाब विचारू शकतात.
-भोजराज पुन्शी, माजी नगराध्यक्ष
बहुसदस्य पद्धत अतिशय योग्य आहे. यात काम करणारा नगरसेवक लोकप्रिय होतो. विशेष म्हणजे न. पा. निधीवरच अवलंबून न राहता अभ्यास करून शासकीय योजनादेखील प्रभागात राबविता येऊ शकतात. मी स्वतः बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असताना निवडून आलो होतो. वाॅर्ड पद्धतीत काम करायला मर्यादा येतात.
-प्रा. संजय घोडेस्वार, माजी नगरसेवक.
एकेरी वाॕर्ड पद्धतीमुळे कामाची विभागणी होत नाही. काम करणारा आणि न करणारा अशी वर्गवारी करण्याची संधी नागरिकांना बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे मिळते. नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी पर्याय उपलब्ध असतो. सहकारी नगरसेवक संपर्कात नसेल तर लोक नेहमी संपर्कात असणाऱ्या सदस्याकडे आपले प्रश्न सहजपणे मांडू शकतात.
-अनिता दिलीप चौधरी, माजी नगराध्यक्षा.
वाॕर्ड रचनेत बाहुबली व धन शक्तीच्या जोरावर प्रभुत्व गाजविले जाते. नागरिकांना पर्याय उपलब्ध नसतो. याउलट प्रभाग रचनेत बहुसदस्यीय पद्धतीमुळे सक्षम नगरसेवक निवडण्याची संधी नागरिकांना मिळते. प्रभाग आकाराने मोठे असतात. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करता येते. मी स्वतः या पद्धतीत नगराध्यक्षा म्हणून काम करताना समाधान अनुभवले.
-आशालता चव्हाण, नगराध्यक्षा.
गेल्या ३५ वर्षांपासून मी सातत्याने निवडून येतोयं. वाॕर्ड व बहुसदस्य पद्धतीचा अनुभव आहे. वाॕर्ड रचनेमुळे नगरसेवकाची जबाबदारी निश्चित होते. त्याला त्यापासून पलायन करता येत नाही. याउलट प्रभाग पद्धतीत जनतेला समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी पर्याय समोर असतात.
-राजेंद्र चौधरी, नगरसेवक.
बहुसदस्य पद्धतीत जबाबदारी व कामे विभागली जातात. त्यामुळे एखादा भाग विकासापासून वंचित राहू शकतो. दोन सदस्यांवर जबाबदारी असल्याने काहीवेळा दुर्लक्ष होते. वाॕर्ड रचनेत असे होत नाही. नागरिक सरळ सदस्याला कामांबाबत विचारू शकतात.
-सूर्यकांत ठाकूर, नगरसेवक.