Muktainagar chief cremated Corona | मुक्ताईनगर मुख्याधिकाऱ्यांनी रात्री केले कोरोना मृतकावर अंत्यसंस्कार

मुक्ताईनगर मुख्याधिकाऱ्यांनी रात्री केले कोरोना मृतकावर अंत्यसंस्कार

ठळक मुद्देरात्री साडेअकराला स्मशानभूमीत लावली हजेरीमहिला मुख्याधिकाऱ्यांच्या माणुसकीचा आगळा अनुभव


विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : केवळ महिनाभरापूर्वीच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी चंद्रपूर जिल्ह्यातून बदलून आलेल्या अश्विनी गायकवाड यांच्या कार्याचा धडाका जोरदार सुरू असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात साफसफाई तसेच प्रवर्तन चौकात मास्क न लावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारत असतानाच मुक्ताईनगरवासीयांना मंगळवारी आगळा-वेगळा, माणुसकीचे दर्शन घडविणारा अनुभव मुख्याधिकाऱ्यांच्या रूपाने पाहायला मिळाला.

मंगळवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला एक रुग्ण मयत झाला व त्या मयत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर आली. मात्र सफाई कर्मचारी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तशी माहिती मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना मिळाली. रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी नगर पंचायतीचे कर निरीक्षक अच्युत निळ यांना भ्रमणध्वनीवरून ाहिती देत आपल्या इतर नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना तत्काळ बोलावून घेतले. याप्रसंगी कर निरीक्षक अच्युत निळ, सचिन काठोके, सुनील चौघरी, रत्नदीप कोचुरे, गणेश कोळी, गोपाल लोहेरे, राहुल पाटील या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता पीपीई किट परिधान करून मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड आणि नगरपंचायतीच्या पथकातील सर्व कर्मचारी क्षणात कोविड रुग्णालयात पोहोचले. त्या ठिकाणी कीट परिधान करून सर्व कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी मयत व्यक्तीचा मुलगा आणि मुलगी हे नातेवाईक उपस्थित होते. मात्र कर्मचारी व मुख्याधिकाऱ्यांयांनी क्षणाचीही वेळ न दवडता मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव केली. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीत रात्रीअकरा वाजताच लाकडांची व्यवस्था करण्यात आली.
रात्री साडेदहा वाजता मिळालेल्या संदेशानंतर जवळपास एक तास पूर्वतयारी केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी व त्यांचे पथक आणि मयताचे मुलगा व मुलगी हे स्मशानभूमीत पोचून रात्री एक वाजेपर्यंत अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पाडला.
शासकीय कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेबद्दल सर्वदूर परखड टीका नेहमीच केली जाते. परंतु मुख्याधिकारी गायकवाड यांच्या रूपाने मुक्ताईनगर तालुक्याला एक धडाकेबाज महिला मुख्याधिकारी मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शासकीय अधिकारीदेखील माणुसकीचे दर्शन घडवतात; याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुख्याधिकारी होय.
एवढेच नव्हे तर एक महिला असल्याची जाणीव असतानादेखील कोणतीही भीती न बाळगता रात्री साडेअकरा वाजेपासून एक वाजेपर्यंत स्मशानभूमीत थांबून आणि आपल्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा उत्साहदेखील वाढवून आपल्या कार्याचा व माणुसकीचा आगळावेगळा ठसा मुख्याधिकारी यांनी उमटवला आहे.
या प्रसंगामुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. असा अधिकारी असेल तर काम करायचा आनंद वेगळाच मिळतो, अशा प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत आहेत.

Web Title: Muktainagar chief cremated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.