मुक्ताई अंतर्धान सोहळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:16+5:302021-06-04T04:14:16+5:30
मुक्ताईनगर : श्रीसंत मुक्ताबाईचा ७२३ वा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा ४ जून रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने छोटेखानी ...

मुक्ताई अंतर्धान सोहळा आज
मुक्ताईनगर : श्रीसंत मुक्ताबाईचा ७२३ वा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा ४ जून रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने छोटेखानी स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. यंदा पांडुरंग परमात्मासह अन्य संतांच्या पादुका या सोहळ्यात सामील होणार नाहीत.
सुमारे ७२४ वर्षांपूर्वी वैशाख वद्य दशमी श्री संत मुक्ताबाई विजेचा प्रचंड कडकडाट तिरोभूत समाधी घेतली होती. त्यावेळी प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ महाराज आदि संत मंडळी हजर होती. श्री संत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर समाधीस्थळ परंपरेने समाधी सोहळा साजरा होत असतो. वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज मानकर यांनी घालून दिलेल्या परंपरेपासून दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा, भजन- प्रवचन, हरिपाठ मान्यवरांची कीर्तने येथे सुरू आहेत.
श्री संत मुक्ताबाई ७२४ वा तिरोभूत अंतर्धान समाधी सोहळा यंदा वैशाख कृष्ण दशमी ४ जून रोजी होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई मंदिरात प्रतिनिधिक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्याचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण होणार आहे. भाविकांनी या माध्यमातून घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर समाधीस्थळ यांनी केले आहे.
परंपरेनुसार दरवर्षी वैशाख दशमीला संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा करतात. यावर्षीचे पंचांगात दशमी तिथी ४ जून रोजी आहे. ५ जून रोजी अहोरात्र एकादशी वृध्दी तिथी व ६ जून रोजीसुद्धा एकादशी तिथी अशी दोन दिवस आलेली आहे. त्यामुळे वारीची, उपवासाची एकादशी ६ जून रोजी करावयाची आहे.
एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी अशी वारकरी भाविकांची भावना असते . परंतु यंदा अनेक वर्षांत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने श्रीसंत मुक्ताबाई समाधी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळींशी विचार विनिमय करून त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार व पंचांगात दिल्याप्रमाणे वैशाख कृष्ण दशमी तिथी ४ जून रोजीच असल्याने त्याच दिवशी यावर्षीचा ७२४ वा संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा साजरा होणार आहेे. यानिमित्ताने संत मुक्ताई मंदिर कोथळी व मुक्ताईनगर येथे ३१ मेपासून दैनंदिन कार्यक्रम नित्यनियमाने सुरू आहेत.