लोकमत न्यूज नेटवर्क
मोठे वाघोदे, ता. रावेर : येथील रमाई नगरमध्ये महावितरणची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या येथील पथकास शिवीगाळ व महिला कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना १३ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या थकबाकीदार महिलेविरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, रमाई नगरमध्ये महावितरणची थकबाकी वसूल करण्यासाठी पथक गेलेले होते. पथक गयाबाई बन्सी वाघ या थकबाकीदार महिलेकडे आले. या महिलेस थकबाकी भरण्यास वारंवार सांगूनदेखील थकबाकी न भरल्याने वीज कनेक्शन कट करण्याच्या कारवाईसाठी आम्ही आलो आहोत, असे पथकाने सांगितले. यावर महिलेने पथकास शिवीगाळ केली. तसेच महिला कर्मचारी सविता विलास बोंडे यांना गयाबाई वाघ यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.
याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गयाबाई वाघ या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. काँ. विनोद पाटील करीत आहेत.
यांचा होता पथकात समावेश...
कनिष्ठ अभियंता प्रसन्ना सुभाष सोळंके, वायरमन सचिन रमेश पाटील, मनेष नारायण पाटील, दिलीप बाजीराव रायपुरे, निखिल लक्ष्मण नेमाडे, अनिल जगन्नाथ जिरीमाळी, कुंदन भागवत चौधरी, राकेश मुरलीधर नेमाडे, राहुल महादेव पाटील, महिला कर्मचारी सविता विलास बोंडे यांचा पथकात समावेश होता.