पाचोरा-जामनेर रेल्वेमार्ग अजिंठा लेणीपर्यंत जोडण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST2021-08-22T04:20:04+5:302021-08-22T04:20:04+5:30
जगप्रसिद्ध अजिंठा लेणींना देशविदेशातील हजारो पर्यटक भेट देत असतात. त्याचा अजिंठा लेणीला येण्या - जाण्यासाठीचा प्रवास सुखकर व्हावा, त्यासाठी ...

पाचोरा-जामनेर रेल्वेमार्ग अजिंठा लेणीपर्यंत जोडण्याच्या हालचाली
जगप्रसिद्ध अजिंठा लेणींना देशविदेशातील हजारो पर्यटक भेट देत असतात. त्याचा अजिंठा लेणीला येण्या - जाण्यासाठीचा प्रवास सुखकर व्हावा, त्यासाठी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला रेल्वेमार्गाने जोडण्यात यावे, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सोयगाव माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सोयगाव शहरात केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्रीपदी रावसाहेब दानवे यांची निवड झाल्याबद्दल बचत भवन सभागृहामध्ये सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सोयगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी हजारो पर्यटक देशविदेशातून येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पाचोरा-जामनेर (जि. जळगाव) या मीटरगेज रेल्वेमार्गाचा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करून पहूर-शेंदुर्णी (जि. जळगाव) येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणींसाठी रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. हे अंतर हे १५ ते २० कि.मी आहे. पाचोरा-जामनेर रेल्वेमार्गासाठी रेल्वेजवळ जमीन संपादित असून फक्त उर्वरित शेंदुर्णी-पहूर (जि. जळगाव) येथून ते जगप्रसिद्ध अजिंठा लेणीपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी रेल्वेला १५ ते २० कि. मी. शेतजमीन संपादित करावी लागणार आहे.
अंत्यत कमी पैशामध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ते पाचोरा जंक्शन हा नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे पर्यटकांसह औरंगाबाद, जळगाव, बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना फायदा मिळणार आहे. त्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लेखी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
पाचोरा जंक्शनवर जलद गाड्यांना थांबा द्या, सोयगाव तालुक्यातील जनतेला जर मुंबई, दिल्ली, नागपूर, हावडा, पुणे येथे जाण्यासाठी पाचोरा जंक्शन हे रेल्वे स्टेशन जवळ व सोयीचे आहे; परंतु या स्थानकावर मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करावा लागत आहे. त्यासाठी पाचोरा जंक्शन (जि. जळगाव) रेल्वेस्थानकावर - विदर्भ एक्स्प्रेस, पंजाबमेल, अमरावती एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, (एलटीटीकडे जाणारा) हावडा एक्स्प्रेस, आजाद हिंद एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी सोयगावचे उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी नवीन रेल्वेमार्गाच्या सर्व्हेसंदर्भात आदेश काढण्यात येतील व पाचोरा जंक्शन रेल्वे स्टेशनवर मेल-एक्स्प्रेस गाड्यांना लवकरच थांबा देण्यात येईल.
यावेळी जि. प. सदस्य पुष्पा काळे, भाजप नेते सुरेश बनकर, सरचिटणीस इद्रिस मुलतानी, माजी आमदार सांडू पाटील, सुनील मिरकर, माजी सरपंच वसंत बनकर, पं. स. सदस्य अनिल खरात, संघपाल सोनवणे, कैलास काळे, कदिर शहा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.