जळगाव : आईचे निधन झाल्यानंतर मुलगा नसल्यामुळे अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न निर्माण झाल्यावर मुली पुढे सरसावल्या. समाजातील जुन्या प्रथांना मागे सारत मुलींनीच आईला खांदा देत अंत्यसंस्कारही केली. ही घटना रविवारी दुपारी सिंधी कॉलनीत घडली.सिंधी कॉलनीतील मोहिनीबाई दयालदास चोईठाणी (७५ ) यांचे शनिवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांना सहा मुली. सर्व मुलींचे लग्न झाले आहे. सिंधी समाजात जर एखाद्या कुटुंबात मुलगा नसेल तर मुलीचा मुलगा किंवा जावाई अंत्यसंस्कार करीत असतात. मोहिनीबाई यांच्या मुली राजकुमार शंकरलाल सोमनानी, उर्मिला विजयकुमार नानवाणी, कांचन सुनीलकुमार लुल्ला, कविता शंकरलाल गोविंदानी, आशा कमलकुमार विचारानी व मंजू पवनकुमार रावलानी या सर्व मुलींनी आईचे अंत्यसंस्कार हे स्वत: करण्याची इच्छा नातलगांकडे व्यक्त केली.यासाठी त्यांनी कंवरनगर सिंधी पंचायतीचे अध्यक्ष अशोक मंधान व पंचायतीच्या इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आतापर्यंत आम्ही मुलाप्रमाणे आई व वडिलांची सेवा केली. त्यानींही आम्हाला कुठलाही दुजाभाव न करता, मुले म्हणून संबोधले.मुलाप्रमाणे आम्ही आतापर्यंत सर्व जबाबदाºया पार पाडल्या. आताही शेवटची जबाबदारी म्हणून आईचे अंत्यसंस्कारही आम्हीच करणार असल्याचे समाज बांधवांना सांगितले. त्यानुसार समाजबांधवांनी मुलींना परवानगी दिली. सर्व बहिणींनी आईला खांदा देऊन नेरी नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
मुलींनी केले आईचे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:46 IST