निरक्षर असलेल्या मातेनं मुलांना बनवलं अधिकारी
By Admin | Updated: May 14, 2017 19:10 IST2017-05-14T19:10:08+5:302017-05-14T19:10:08+5:30
अशा परिस्थितीत कुटुंबाला आधार द्यावा या हेतूने कधी शेतीकामं तर कधी पिठाच्या गिरणीवर त्यांनी काम करणं सुरू केलं.

निरक्षर असलेल्या मातेनं मुलांना बनवलं अधिकारी
महेश कौंडिण्य / ऑनलाइन लोकमत
पाचोरा, जि. जळगाव, दि. 14 - शिक्षणाची किंचितही ओळख नसलेल्या सुवर्णा बापू जाधव यांचं लगA वयाच्या तेराव्या वर्षी झालं. पती मजुरी करायचा. अशा परिस्थितीत कुटुंबाला आधार द्यावा या हेतूने कधी शेतीकामं तर कधी पिठाच्या गिरणीवर त्यांनी काम करणं सुरू केलं.
स्वत: निरक्षर असूनही मनात मुलांना शिकवण्याची जिद्द होती. काही वेळेस नातेवाइकांनीसुद्धा मदत नाकारली.
त्यांचे पती बापू जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना मोठी, जड कामं करणं कठीण झालं. मग पुन्हा सुवर्णाताईंनी जुने कपडे, ब्लाऊज शिवणं, निवडक ठिकाणी घरकाम करणं सुरू ठेवलं. पण संघर्षाची झळ त्यांनी आपल्या मुलांना कधीच बसू दिली नाही. मुलांना वसतिगृहात पाठवून त्यांच्यात शिक्षणाची उर्मी निर्माण केली.
लहान बाळांची अंघोळ घालणं, मसाज करणं असली कामंदेखील त्यांनी आनंदानं केली. लाचारीनं न जगता त्यांनी आपल्या मुलांना स्वाभिमानाचा धडा दिला. आज त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाला फळ आलंय.
मुलगी वैशाली पदवीधर झालीय. एवढंच नव्हे तर आज नायगाव मुंबईला पोलीस खात्यात रूजू झाली आहे आणि मुलगा संदीप पदवीधर होऊन स्वत:च्या पायावर उभा राहण्याच्या तयारीत आहे. आपल्या मुलांना मोठं स्वावलंबी होताना बघून या आईचा ऊर नकळत भरून येतोय.