जळगावात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पोलीस ठाण्याची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:03+5:302021-05-18T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असतानाही मॉर्निंग वॉकला निघालेल्या ५१ जणांची सोमवारी सकाळी रामानंद ...

जळगावात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पोलीस ठाण्याची हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असतानाही मॉर्निंग वॉकला निघालेल्या ५१ जणांची सोमवारी सकाळी रामानंद नगर पोलिसांनी पोलीस वाहनातून सवारी काढत त्यांना थेट पोलीस ठाण्यात नेले. दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले.
जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतच चाललेला असताना विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना शहरात विनाकारण करणाऱ्या लोकांवर कारवाईचे निर्देश दिले. डॉ. मुंढे स्वतः रस्त्यावर उतरले होते, तर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे देखील सकाळी शहरात फिरले.
आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकात कारवाई
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर सोमवारी सकाळी सहा वाजताच आपला ताफा घेऊन आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकात आले. याठिकाणी मॉर्निंग वाॅक करणाऱ्यांना पकडून पोलीस वाहनात बसविले. वाहनात बसवून थेट पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्यांच्यावर प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात आला. उद्यापासून बाहेर न फिरण्याबाबत सक्त ताकीद देऊन या लोकांना सोडण्यात आले.
दरम्यान, फिरणाऱ्या तीनजणांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे याप्रमाणे दीड हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यासह विना पार्टिशन असलेल्या सात रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २८०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
भाजी विक्रेत्यांना तंबी
शहरात भाजी विक्रेत्यांनाही काही निर्बंध घालून दिले आहेत. जागाही निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी सकाळी मायादेवी नगर, महाबळ, मानराज पार्क, गिरणा टाकी आदी भागात भाजी विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच कोरोनाच्या निर्बंधाचे पालन त्यांच्याकडून केले जात नव्हते. पोलिसांनी या सर्व विक्रेत्यांना अंतर आखून दिले व त्याच जागी व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. सोबत मास्कचा वापर आवश्यक असल्याबाबत तंबी दिली.
कोट....
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. ज्या कुटुंबात कोरोनाचा रुग्ण आढळला किंवा दुर्घटना घडली असेल, तर त्या कुटुंबाची काय स्थिती आहे, याची जाणीव व गांभीर्य त्यांनाच आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून घरी व सुरक्षित राहावे.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
अशी आहे कारवाई
माॅर्निंग वाॅक : ५१
विना मास्क : ०३
रिक्षा : ०७