जळगावात महामार्गावर पहाटे अपघात; दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:51+5:302021-07-09T04:11:51+5:30
जळगाव : महामार्गावर नशिराबाद गावानजीक गुरुवारी पहाटे तीन वाजता भरधाव कार पलटी होऊन अभिजीत सुभाष पसारे (३०,रा.डोंबिवली, मूळ ...

जळगावात महामार्गावर पहाटे अपघात; दोन तरुण ठार
जळगाव : महामार्गावर नशिराबाद गावानजीक गुरुवारी पहाटे तीन वाजता भरधाव कार पलटी होऊन अभिजीत सुभाष पसारे (३०,रा.डोंबिवली, मूळ रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) व पवन नंदू बागुल (२८, रा.मानपाडा) हे दोघे तरुण ठार झाले. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दुभाजकावर धडकून पाच वेळा पलटी झाल्याने दोघांचा त्यात जीव गेला.
अभिजीत पसारे याचे साकेगाव, ता. भुसावळ येथील तरुणीशी लग्न ठरले होते. साखरपुडाही झालेला आहे. या तरुणीच्या वडिलांना कर्करोगाचा आजार असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. वाग्दत्त वधू व होणारी सासू या दोघांना सोडण्यासाठी कारने तो आला होता.पवन बागुल याचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे. त्याची सासुरवाडी मालेगाव येथील आहे. पत्नी दोन दिवसांपूर्वीच मालेगावला आलेली आहे. परत जाताना मालेगाव येथून पवनच्या पत्नीला घेऊन जाण्याचे त्यांनी नियोजन केले होते. त्यानुसार बुधवारी रात्री दोघेजण कारने मालेगावच्या दिशेने निघाले असता नशिराबाद सोडल्यानंतर सरस्वती फोर्ड या शोरुमसमोर हा अपघात झाला. अभिजीत हा जागीच ठार झाला तर पवन याचा सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.