सातबारावरील ७०० हून अधिक फेरफार नोंदी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:28+5:302021-09-21T04:19:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यावरील अनेक नोंदी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या अंगकाढूपणामुळे प्रलंबित आहेत. जळगाव तालुक्यातील ...

More than 700 changes on Satbara are pending | सातबारावरील ७०० हून अधिक फेरफार नोंदी प्रलंबित

सातबारावरील ७०० हून अधिक फेरफार नोंदी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यावरील अनेक नोंदी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या अंगकाढूपणामुळे प्रलंबित आहेत. जळगाव तालुक्यातील एकट्या पिंप्राळा महसूल मंडळात तब्बल ७०० हून अधिक नोंदी प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना या नोंदी किंवा फेरफार मंजूर करवून घेण्यासाठी मंडळ अधिकारी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. आव्हाणे, कानळदा, फुपनगरी, वडनगरी, खेडी, सावखेडा या गावातील शेतकरी पिंप्राळा महसूल मंडळाच्या कारभाराला कंटाळले असून, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

शेतकरी तहसील कार्यालयात जातात; पण मंडळ अधिकारी भेटत नाहीत, ते कार्यालयात नसतात. असे प्रकार सर्वत्र आहेत. शेतकरी यामुळे मेटाकुटीस आले असून, पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. मध्यंतरी जळगाव येथील तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासोबत ऑनलाइन बैठक घेतली. त्यातही प्रलंबित फेरफार, नोंदी निकाली काढण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. अधिकाधिक दिवस काम करा, अधिकाधिक वेळ देऊन नोंदी निकाली काढा, शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको, अशा सूचना दिल्या होत्या; परंतु त्याची दखल मंडळ अधिकाऱ्यांनी न घेता दुर्लक्ष केले. कर्जाचे बोजे, वारस नोंदी, शासनादेशानुसार नजर गहाण, तगाई या नोंदीदेखील निकाली काढल्या जात नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. अनेक गावांमधील शासकीय जमिनीच्या अधिग्रहणासंबंधीदेखील नोंदी प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तलाठ्यांनी आपले कर्तव्य केले; पण पुढे मंडळ अधिकाऱ्याकडे या नोंदी निकाली काढण्यासाठी वेळ, भाडे खर्च करावे लागत आहे. तहसील कार्यालयात दोन ते तीन तास थांबूनही काम होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. असाच प्रकार जामनेर, भुसावळ, चोपडा, यावल येथेही सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमध्ये काही भागात समन्वय नाही, असाही मुद्दा आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही जळगाव तालुक्यातील शेतकरी निवेदन सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

कोट..

पिंप्राळा महसूल मंडळातील अनेक नोंदी रखडल्या आहेत. यामुळे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहारासह इतर कामेदेखील यामुळे थांबली आहेत. पिंप्राळा महसूल मंडळामध्येच अनेक नोंदी प्रलंबित असून, जिल्ह्यात तर ही स्थिती मोठी आहे.

-ॲड. हर्षल चौधरी, शेतकरी व पंचायत समिती सदस्य,

Web Title: More than 700 changes on Satbara are pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.