शहरात ५०० हून अधिक नागरिक राहताहेत धोकेदायक इमारतींमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:42+5:302021-09-23T04:18:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी ...

More than 500 citizens live in dangerous buildings in the city | शहरात ५०० हून अधिक नागरिक राहताहेत धोकेदायक इमारतींमध्ये

शहरात ५०० हून अधिक नागरिक राहताहेत धोकेदायक इमारतींमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा येथे सोमवारी रात्री तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यात अनेक धोकेदायक इमारत कोसळण्याच्या घटना या घडत असतात, जळगाव शहरातदेखील १०८ धोकेदायक इमारती असून, या इमारतींमध्ये ५०० हून अधिक नागरिक दररोजची रात्र जीव मुठीत घेऊन काढत आहेत. मनपाकडून दरवर्षी इमारत मालकांना नोटीस बजाविण्याची औपचारिकता केली जाते. मात्र, कोणतीही कार्यवाही या इमारतींबाबत होताना दिसून येत नाही.

शहरात अखेरच्या घटका मोजत असलेल्या तब्बल १०८ इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीच्या मालकांना नोटीस बजावण्याची ‘औपचारिकता’ महापालिकेकडून पार पाडली जाते. मात्र ही काही वर्षांपासूनची नोटीस देण्याची परंपरेचा प्रशासन व इमारत मालक यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने याठिकाणी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण मनपा नेहमी नोटीस देते, आणि इमारत मालक त्या नोटिसीकडे नेहमी दुर्लक्ष करत असतो. शहरातील तब्बल १०८ पडक्या इमारती कनिष्ठ अभियंत्यांनी सर्वेक्षण करून धोकादायक ठरविल्या आहेत. यातील इमारतींमध्ये आजही काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन वावरत आहेत.

दंडात्मक शिक्षेची तरतूद

दरवर्षी महापालिका मालकांना ‘महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. मात्र काहीच उपयोग होत नाही. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मनपाकडून अशाप्रकारे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

मनपा प्रशासनही इमारत पडण्याचा प्रतीक्षेत

पाचोरा येथे सोमवारी रात्री अचानक तीन मजली इमारत कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे जिल्हाभरातील धोकेदायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरात १०८ इमारती धोकेदायक ठरविण्यात आल्या आहेत. याठिकाणचे रहिवासी ही इमारत सोडायला तयार नाही व मनपा प्रशासन याबाबत कारवाई करायला तयार नाही. मनपा प्रशासन याबाबत कारवाई करण्यासाठी मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

शिवाजीनगरात कोसळले घर

यंदा सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील शिवाजीनगर भागातील एक घरदेखील कोसळले, या घरात सुदैवाने कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरात अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपाने केवळ नोटिसांचा फार्स न दाखवता कार्यवाही करण्याची गरज आहे.

Web Title: More than 500 citizens live in dangerous buildings in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.