माकडाने झडप घालून केले महिलेला ठार
By Admin | Updated: August 27, 2016 21:41 IST2016-08-27T21:40:42+5:302016-08-27T21:41:14+5:30
रक्षाबंधन साजरा करुन घरी निघालेल्या नवविवाहीतेवर माकडाने अचानक झडप घातल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे

माकडाने झडप घालून केले महिलेला ठार
>- ऑनलाइन लोकमत
रावेर, दि. 27 - मध्य प्रदेशातील बंभाडा जि बऱ्हाणपूर येथून रक्षाबंधननिमीत्त भावाला राखी बांधून तालुक्यातील बक्षीपूर येथे येण्यासाठी मोटारसायकलवर पतीसोबत निघालेल्या २२ वर्षीय नवविवाहीतेवर माकडाने अचानक झडप घातल्याने ती धावत्या मोटारसायकलवरून खाली कोसळून गंभीर जखमी झाली. अत्यावस्थेत जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना तिचा वाटेतच करूण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरची दुर्घटना इंदूर - अमरावती महामार्गावरील शाहपूरनजीकच्या कालूशा बाबा दर्गाहजवळ बुधवारला घडली.
रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथील नवविवाहिता सौ.रूपाली दिपक महाजन (वय-22)ही आपल्या चिमुरडीसह बंभाडा ता. जिल्हा. बऱ्हाणपूर येथे माहेरी रक्षाबंधनसाठी गेली होती. आपल्या भावाला राखी बांधून ती पती दिपक प्रभाकर महाजन याच्यासोबत मोटारसायकलवर घरी परत येत असताना शाहपूर - बऱ्हाणपूर दरम्यानच्या महामार्गावरील कालूशाबाबा दर्गाहजवळ अचानकपणे माकडाने धावत्या मोटारसायकलवर तिच्यावर झडप घातल्याने ती थेट रस्त्यावर खाली कोसळून पडली. तिच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून मेंदूतून रक्तस्राव सुरू झाल्याने तिला अत्यावस्थेत बऱ्हाणपूरला रूग्णालयात आणले. मात्र तातडीच्या अत्यावश्यक उपचारासाठी तिला जळगाव येथे हलवत असतांना तिचा वाटेतच करूण अंत झाला. ही घटना बुधवारला रात्री उशिरा घडली.
रावेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
अवघ्या दोन वर्षापुर्वीच विवाह झालेल्या या नवविवाहीतेच्या पश्चात पतीसह एक वर्षाची तान्हुली असल्याने समाजमनातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. बक्षीपूर येथील माजी उपसरपंच प्रभाकर महाजन यांची ती सून तर बंभाडा येथील काशीनाथ देवलाल चौधरी यांची सुकन्या होत. शोकाकुल वातावरणात या नवविवाहीतेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.