सोमवारी संत मुक्ताई पालखी जाणार पंढरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:00+5:302021-07-18T04:13:00+5:30

मुक्ताईनगर : महाराष्ट्रातील वारकरी, कष्टकरी व शेतकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाच्या आषाढी वारी दर्शनासाठी संत मुक्ताबाई पालखी ...

On Monday, Sant Muktai Palkhi will go to Pandhari | सोमवारी संत मुक्ताई पालखी जाणार पंढरीला

सोमवारी संत मुक्ताई पालखी जाणार पंढरीला

मुक्ताईनगर : महाराष्ट्रातील वारकरी, कष्टकरी व शेतकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाच्या आषाढी वारी दर्शनासाठी संत मुक्ताबाई पालखी पादुका सोहळा ४० वारकरी प्रतिनिधींसमवेत शिवशाही बसने सोमवारी पहाटे ४ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याकरिता दोन शिवशाही बस येथील आगारात दाखल झाल्या आहेत.

कोरोना पार्श्वभूमीवर आषाढी वारीवर निर्बंध असून फक्त मानाच्या पालख्यांना मर्यादित वारकऱ्यांसह पंढरीत प्रवेश मिळणार आहे. यात मुक्ताबाई पालखीचा समावेश असून १४ जून रोजी संत मुक्ताबाई पालखी सोहळा जुने मंदिर कोथळी येथून प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होईल. पालखी नवीन मंदिरात मुक्कामाला होती‌. महिनाभर तेथेच नित्योपचार पूजा, कीर्तन व भजन पार पडले. सोमवारी आषाढ शुद्ध दशमी रोजी पहाटे ४ वा. शासनाच्या दिशानिर्देशानुसार राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या शिवशाही बसने मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा कोथळी - मुक्ताईनगर पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथकासह रुग्णवाहिका सोबतीला असणार आहे.

४० वारकरी जाणार सोबत

४० वारकरी भाविकांना पालखीसोबत परवानगी असून त्यांचे लसीकरण व कोविड चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या प्रतिनिधीची नावे घेण्यात आली आहेत. यामध्ये संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, पुजारी, मानकरी, सेवाधारी, संत मुक्ताबाई फडावरील महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकार यांच्यासह सद्गुरू सखाराम महाराज सखारामपूर, मुकुंद महाराज एणगावकर, झेंडूजी महाराज बेळीकर, दिगंबर महाराज चिनावलकर, पंढरीनाथ महाराज मानकर, वक्ते निवृत्ती बाबा, दत्तूजी महाराज, मांगोजी महाराज कोकलवाडी, ह.भ.प. सारंगधर महाराज दिंडी आदी दिंडी परंपरेचे पाईक व गादीपती यांचा समावेश करण्यात आला आहे.

शासनाकडून नायब तहसीलदार प्रदीप झांबरे हे पालखीसोबत समन्वयक म्हणून राहणार आहेत. आरोग्य विभागाने डॉ. प्रताप राठोड, विजय पाटील, बिऱ्हाडे यांच्यासह आरोग्य पथकाने सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध केलेली आहे.

येती वारकरी । वाट पाहतो तोवरी‌ ।।

घालोनी दंडवत । पूसे निरोपाची मात ।।

पत्र दिले हाती । जया जैसे पाठवीले।।

तुका म्हणे लोटांगण । घालीत जाईन सामोरा ।।

Web Title: On Monday, Sant Muktai Palkhi will go to Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.