रस्त्यावरच मोकाट जनावरांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:22+5:302021-09-25T04:15:22+5:30
भुसावळ : शहरात खड्डेमय रस्त्यांसह वाहनचालकांना मोकाट जनावरांचाही सामना करावा लागत आहे. सावधान.! पुढे मोकाट ...

रस्त्यावरच मोकाट जनावरांचा ठिय्या
भुसावळ : शहरात खड्डेमय रस्त्यांसह वाहनचालकांना मोकाट जनावरांचाही सामना करावा लागत आहे. सावधान.! पुढे मोकाट जनावरांचा ठिय्या आहे... वाहने सावकाश चालवा, अन्यथा अपघाताची शक्यता..अशी वस्तुस्थिती शहरात निर्माण झाली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. बसस्थानकासमोरील रस्त्यावरही नेहमीच मोकाट गुरे बसलेली असतात. मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला असून, वाहन चालकांच्या अंगावर मोकाट जनावरे कधी धावून येतील हे याचा नेम नाही.
शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेकवेळा मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. अशावेळी वाहतूक पोलीसही हजर नसतात. वाहचालकांना जीव धोक्यात घालून रस्त्याने वाहन चालवावे लागते. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगर पालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
मोकाट जनावरांना कोण ‘लगाम’ घालणार ?
शहरातील रस्त्यावर ठिय्या मांडून बसणाऱ्या या मोकाट जनावरांना कोण लगाम घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही वेळेस तर ही जनावरे हॉर्न वाजवूनही उठत नसल्याने वाहन चालकांना वाहन सोडून रस्त्यावरील जनावरांना बाजूला करावे लागते.
या मार्गावर वाहने जपून चालवा
जळगाव नाका ते गांधी पुतळा
मामाजी टॉकीज रोड ते दगडी पूल
बस स्टँड चौक ते बाजारपेठ पोलीस स्टेशन
पांडुरंग चौक ते नहाटा चौफुली व बाजारपेठ परिसर
कारवाई करण्याबाबत टाळाटाळ
काही दिवसांपूर्वी नगर पालिकेकडून शहरात मोकाट जनावरांना बांधून ठेवण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानंतर या जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे बांधून ठेवली. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. तर कारवाई होत नसल्याने मालकही आपली जनावरे दिवसभर मोकाट सोडून देतात.