कारागृहातून पलायन करणाऱ्या तिघांना मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:46+5:302021-03-04T04:28:46+5:30
जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या सागर संजय पाटील (२३, रा.पैलाड, अमळनेर), गौरव विजय पाटील (२२, रा.तांबापुरा, अमळनेर) या दोघांसह ...

कारागृहातून पलायन करणाऱ्या तिघांना मोक्का
जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या सागर संजय पाटील (२३, रा.पैलाड, अमळनेर), गौरव विजय पाटील (२२, रा.तांबापुरा, अमळनेर) या दोघांसह या गुन्ह्यात दुचाकीवरून पळवून नेण्यात मदत करणारा जगदीश पुंडलिक पाटील (१९, रा.पिंपळकोठे, ता.एरंडोल) या तिघांवर मोक्काची कारवाई झाली असून, त्यांच्यावरील गुन्ह्यांची संख्या पाहता, तपासकामी दिलेला ९० दिवसांचा कालावधी १८० दिवस वाढवून मिळण्याचा अर्ज जिल्हा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे.
बडतर्फ पोलीस कर्मचारी सुशील मगरे याच्यासह गौरव व सागर या तिघांनी गेल्या वर्षी रक्षकाला पिस्तूल लावून कारागृहातून पलायन केले होते, तर जगदीश पाटील याने तिघांना दुचाकीवर बसवून पळवून नेण्यात मदत केली होती. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र.एम.पी.१० एन.ए.४७६४) जप्त करण्यात आली होती. चौकशीत जगदीश पाटील याने वर्षभरापूर्वी टोळी, ता.एरंडोल गावाजवळ चालत्या दुचाकीला लाथ मारून ही दुचाकी घेऊन पलायन केल्याचे निष्पन्न झाले. जगदीश याला न्यायालयाकडून ट्रान्सफर वारंट घेऊन एक दिवस पोलीस कोठडी घेतली असता, ही दुचाकी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आली व त्याच वेळी एरंडोल पोलिसांनी केलेल्या चौकशीत या तिघांविरुद्ध तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.
एरंडोल पोलिसांनी पाठविला होता प्रस्ताव
एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी या गुन्ह्यांची कुंडली एकत्रित करून तिघांविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे पाठविले होता. डॉ.मुंढे यांनी त्यास मंजुरी देऊन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविला. त्यांनी त्यास मंजुरी दिली. त्यानुसार, या तिघांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
जिल्हा सरकारी वकिलांचा अर्ज
मोक्का लागलेल्या तिघांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने ९० दिवसांची मुदत दिली आहे, ती वाढवून १८० दिवस करण्याबाबत जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात अर्ज दिला. त्यात आरोपींनी अवैध मार्गाने मिळविलेली संपत्ती जमविली, त्यातून कोणाला किती लाभ मिळाला, गुन्ह्यांमध्ये तांत्रिक साधनांचा वापर कसा केला, याशिवाय त्यांना कोणी मदत केली आहे, याची चौकशी केली जाणार असल्याचे ॲड.ढाके यांनी म्हटले आहे.