आजपासून विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:33+5:302021-06-16T04:22:33+5:30
अमळनेर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, मंगळवार १५ पासून पुन्हा ...

आजपासून विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिसणार
अमळनेर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, मंगळवार १५ पासून पुन्हा ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिसणार आहेत.
तालुक्यात एकूण २६२ शाळा असून पहिली ते बारावीपर्यंत सुमारे ५५ हजार ४२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १३३ जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकेच्या ६ शाळा, २ शासकीय आश्रम शाळा तर १२१ इतर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, खासगी प्राथमिक शाळा आहेत.
ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला असला, तरी विविध शाळांमध्ये पहिली, पाचवी, आठवीपासून शाळा असल्याने प्रवेश झालेले नाहीत. दहावीचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे अकरावीच्या कला, शास्त्र, वाणिज्य प्रवेश प्रक्रिया झालेल्या नसल्याने नेमके किती विद्यार्थी वर्गात आहेत, याबाबत शिक्षकही गोंधळात आहेत.
बाजारात पुस्तके नाहीत, त्यामुळे मुलेदेखील पुस्तकांविना कसे शिकणार? हीदेखील समस्या आहे. अनेक मुलांनी जुनी पुस्तके हरवली, रद्दी केली. त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांची पुस्तके पुढील विद्यार्थ्यांना देणे शक्य होणार नाही.
पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१ ली - अद्याप प्रवेश नाही
२ री- ४०१७
३ री - ४१९०
४ थी- ४४२७
५ वी- ४५६४
६ वी- ४६७८
७ वी- ४५२५
८ वी- ४४३९
९ वी- ४३५३
१०वी- ४२५५
११वी-४२०५
१२वी-२९००
शासनाने मागील वर्षापासून जुनी पुस्तके वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे कमी असलेल्या पुस्तकांच्या संख्येची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पुस्तके आल्यावर पुस्तके मिळतील.
-आर. डी. महाजन, गटशिक्षणाधिकारी, अमळनेर