मास्टर कॉलनीत अनधिकृत हॉकर्सच्या जमावाने केला मनपाच्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:28+5:302021-02-05T06:01:28+5:30

जप्त केलेले साहित्य बळजबरीने घेतले परत : स्थानिकांसह परजिल्ह्यातील व्यावसायिकांचा सहभाग ; लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मास्टर ...

A mob of unauthorized hawkers attacked the Corporation's squad in Master Colony | मास्टर कॉलनीत अनधिकृत हॉकर्सच्या जमावाने केला मनपाच्या पथकावर हल्ला

मास्टर कॉलनीत अनधिकृत हॉकर्सच्या जमावाने केला मनपाच्या पथकावर हल्ला

जप्त केलेले साहित्य बळजबरीने घेतले परत : स्थानिकांसह परजिल्ह्यातील व्यावसायिकांचा सहभाग ;

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मास्टर कॉलनीत भरणारा अनधिकृत बाजार उद‌्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकावर अनधिकृत हॉकर्सच्या जमावाने हल्ला केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ११ वाजता घडला. सुमारे ५० ते ६० जणांच्या जमावाने मनपाच्या पथकावर हल्ला करत मनपाने जप्त केलेल्या सर्व हातगाड्या व साहित्य बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच मनपाच्या पथकाला बाहेर जाण्यास सांगितले. याप्रकरणी मनपाकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, व्हिडिओव्दारे हल्लेखोरांची ओळख केली जात आहे. या हल्लेखोरांमध्ये स्थानिकांसह परजिल्ह्यातील हॉकर्सचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

मास्टर कॉलनी भागात दर बुधवारी ‘बुधबाजार’ भरत असून, या बाजारासाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याठिकाणी बुधवारी परजिल्ह्यातून अनेक व्यावसायिक येत असून, याठिकाणी अनधिकृतपणे दुकाने थाटली जातात. ‘बुध बाजारात’ बुधवारी हजारो नागरिकांची गर्दी होत असल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत, बुधवारी सकाळी १० वाजता मनपाचे पथक याठिकाणी पोहचले. सुरुवातीला ८ ते १० हॉकर्सवर कारवाई करत माल जप्त करण्यात आला. यावेळी हॉकर्सने मनपाच्या पथकाचा विरोध करत, कारवाई न करण्याचा दम भरला. मात्र, मनपाच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे हळूहळू याठिकाणी हॉकर्स एकत्र येत, गर्दी वाढली.

गोंधळ घालत, जप्त केलेला माल बळजबरीने हिसकावला

मनपाच्या पथकात ८ ते १० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मनपाच्या कारवाईनंतर हॉकर्सची गर्दी वाढत गेली, त्यानंतर ५० ते ६० हॉकर्स एकत्र आल्यानंतर जप्त केलेला माल परत देण्याची मागणी हॉकर्सने केली. मनपाच्या पथकाने जप्त केलेला माल ट्रॅक्टरमध्ये भरून याठिकाणाहून काढता पाय करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवले. तसेच सर्व हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांना घेराव घालत, ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आलेला सर्व जप्त माल काढून घेण्यात आला. जमाव जास्त असल्याने मनपाच्या पथकाला या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला.

मनपा उपायुक्तांनी केली पाहणी

या घटनेनंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या भागात दुपारी १२ वाजता जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक हॉकर्सने याठिकाणाहून पळ काढला. उपायुक्तांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानुसार मनपाच्या पथकाने केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगव्दारे वाद घालणाऱ्या हॉकर्सची पळताळणी करण्यात आली आहे. प्रत्येकाची ओळख करून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

परजिल्ह्यातील हॉकर्स झाले मुजोर

मास्टर कॉलनीत भरणाऱ्या या बाजारात परजिल्ह्यातून येणाऱ्या हॉकर्सची मुजोरी वाढत असून, मनपाची कोणतीही परवानगी या बाजारासाठी घेण्यात आलेली नाही. तसेच या हॉकर्सला स्थानिकांचा देखील पाठिंबा भेटत असून, ही मुजोरी दिवसेंदिवस वाढत जात आहे. याआधी देखील या भागात मनपाच्या पथकासोबत वाद घालण्यात आला होता. दरम्यान, या भागातील संपूर्ण बाजार पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार आहे. अनधिकृत हॉकर्सबाबत मनपाची भूमिका जाहीर असून, पथकावर हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा उपायुक्तांनी दिला आहे.

Web Title: A mob of unauthorized hawkers attacked the Corporation's squad in Master Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.