आमदार निधीतील निधी खर्चातही हात आखडता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:20+5:302021-05-05T04:26:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आपापल्या मतदार संघातील विकासकामांसाठी दिला जाणाऱ्या आमदार निधीपैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षात निम्मा निधीदेखील ...

आमदार निधीतील निधी खर्चातही हात आखडता
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आपापल्या मतदार संघातील विकासकामांसाठी दिला जाणाऱ्या आमदार निधीपैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षात निम्मा निधीदेखील खर्च झालेला नाही. कोरोनामुळे यंत्रणांकडून निधीची मागणी न झाल्याने निम्म्याहून अधिक निधी समर्पित करावा लागला आहे. यामध्ये सर्वच मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात निधी शिल्लक राहिला. सर्वात कमी निधी भुसावळ मतदारसंघात खर्च झाला असून, सर्वाधिक निधी जामनेर मतदार संघात खर्च झाला आहे.
विधानसभा सदस्य तसेच विधानपरिषद सदस्य असलेल्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी निधी दिला जातो. यामध्ये प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात करावयाच्या कामांसंदर्भात शिफारस करतात. मात्र, २०२०-२१ या वर्षात हा निधी खर्च करण्यावरदेखील कोरोनाचा परिणाम झाला आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला व त्याचा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला. यामध्ये जिल्हा वार्षिक विकास योजनांसाठी मंजूर निधीतही ६७ टक्क्यांनी कपात करण्यात आली. जो ३३ टक्के निधी मिळाला, त्यापैकी ५० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. कोरोनाची स्थिती सुरळीत होत असताना, जिल्ह्यासाठी नंतर मंजूर सर्व निधी मिळाला. कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे निधी मिळणे अवघड झाले असताना मतदार संघामध्ये विकासकामांसाठी आमदारांना मिळणारा निधी समर्पित करावा लागला.
जामनेर मतदारसंघात सर्वाधिक खर्च
जिल्ह्यातील ११ मतदार संघांमध्ये प्रत्येक विधानसभा सदस्यांना तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानंतर एरंडोल मतदार संघासाठी ४७ लाख सहा हजारांचा पूरक निधी व उर्वरित सर्व मतदार संघांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा पूरक निधी मिळाला. अशाप्रकारे एरंडोल मतदारसंघ वगळता उर्वरित दहा मतदार संघांसाठी तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला तर एरंडोल मतदारसंघाला ३ कोटी ४७ लाख सहा हजार रुपयांचा एकूण निधी प्राप्त झाला. यापैकी जामनेर मतदार संघात सर्वाधिक तीन कोटी ४१ लाख ४० हजार रुपयांचा निधी खर्च झाला. त्या खालोखाल एरंडोल मतदारसंघात दोन कोटी ९६ लाख ४८ हजारांचा निधी तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात दोन कोटी २५ लाख ९३ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. सर्वात कमी ६० लाख ११ हजार ३०० रुपयांचा निधी भुसावळ मतदार संघात खर्च झाला.
कामे अपूर्ण असल्याने निधीची मागणी नाही
गेल्यावर्षी कोरोना संसर्गामुळे कामे अपूर्ण राहिल्याने यंत्रणांकडून निधीची मागणी झाली नाही. त्यामुळे सर्वच मतदारसंघात निधी शिल्लक राहिला. त्यानंतर आर्थिक वर्षअखेर तो निधी समर्पित झाला.
विधानपरिषद सदस्यांचाही निधी शिल्लक
विधानसभा सदस्यांसह विधानपरिषद सदस्यांना मिळालेला निधीदेखील या वर्षात शिल्लक राहिला. यामध्ये आमदार चंदूलाल पटेल यांना तीन कोटी ६७ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी दोन कोटी ४७ लाख २३ हजार रुपयांचा निधी खर्च झाला तर एक कोटी २० लाख ६३ हजार रुपयांचा निधी शिल्लक राहिला. यासोबतच माजी आमदार स्मिता वाघ यांना ७० लाख ११ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. त्यापैकी ५१ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा निधी खर्च झाला व १८ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा निधी शिल्लक राहिला. हा निधीदेखील समर्पित करावा लागला. एकूणच विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना मिळालेल्या एकूण ४२ कोटी ८५ लाख तीन हजार रुपयांच्या प्राप्त निधीपैकी २१ कोटी ७२ हजार १०० रुपयांचा निधी खर्च झाला तर २१ कोटी ८४ लाख ३० हजार ९०० रुपयांचा निधी शिल्लक राहिला.
मतदारसंघनिहाय निधीची स्थिती
मतदारसंघ - प्राप्त निधी - खर्च - समर्पित
चोपडा - ३ कोटी ५० लाख - ७६ लाख ९० हजार - २ कोटी ७३ लाख १० हजार
जामनेर - ३ कोटी ५० लाख - ३ कोटी ४१ लाख ४० हजार - ८ लाख ६० हजार
जळगाव शहर - ३ कोटी ५० लाख - १ कोटी ६६ लाख ३८ हजार - एक कोटी ८३ हजार ६२ हजार
जळगाव ग्रामीण - ३ कोटी ५० लाख - २ कोटी २५ लाख ९३ हजार - एक कोटी २४ हजार ७ हजार
एरंडोल-पारोळा - ३ कोटी ४७ लाख ६ हजार - २ कोटी ९६ लाख ८८ हजार - ५० लाख १८ हजार
अमळनेर - ३ कोटी ५० लाख- ८५ लाख ५७ हजार - २ कोटी ६४ लाख ४३ हजार
पाचोरा-भडगाव - ३ कोटी ५० लाख - ८२ लाख ५० हजार ३०० - २ कोटी ६७ लाख ४९ हजार ७००
चाळीसगाव - ३ कोटी ५० लाख - २ कोटी १५ लाख ८८ हजार - १ कोटी ३४ लाख १२ हजार
भुसावळ - ३ कोटी ५० लाख - ६० लाख ११ हजार ३०० - २ कोटी ८९ लाख ८८ हजार ७००
मुक्ताईनगर - ३ कोटी ५० लाख - एक कोटी ४० हजार ६० हजार - २ कोटी ९ लाख ४० हजार
रावेर - ३ कोटी ५० लाख - एक कोटी ९ लाख ७१ हजार - २ कोटी ४० लाख २९ हजार