पुतळा परिसरात अस्वच्छतेवरून आमदार लंके यांनी ग्रामपंचायत प्रशासनास खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:16+5:302021-09-15T04:22:16+5:30
भुसावळ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसरात अस्वच्छता पाहून भुसावळ येथे एका कार्यक्रमाला आलेले पारनेरचे ...

पुतळा परिसरात अस्वच्छतेवरून आमदार लंके यांनी ग्रामपंचायत प्रशासनास खडसावले
भुसावळ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असलेल्या परिसरात अस्वच्छता पाहून भुसावळ येथे एका कार्यक्रमाला आलेले पारनेरचे आमदार लंके सोमवारी कंडारी गावात गेले असता ग्रामपंचायत प्रशासनाला या विषयावरून चांगलेच खडसावले. इतकेच नव्हे तर ज्या महामानवामुळे प्रत्येक सर्वसामान्यांना लोकशाहीचा आधार दिला याची जाणीव करून देत पुतळ्याची स्वच्छतादेखील केली.
कंडारी-साकेगाव जिल्हा परिषद गटात जि. प. सदस्य रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नाने झालेल्या १० कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी सोमवारी आमदार लंके भुसावळात आले होते. ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रमानंतर त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते.
कंडारी येथील भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना त्यांनी अस्वच्छतेच्या प्रश्नावर बोट ठेवले. ग्रामपंचायत प्रशासनासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी याकडे लक्ष वेधले पाहिजे, असे सांगून त्यांनी गाडीतून सिलबंद पाण्याची बाटली काढून स्वत:च पुतळ्याची पाण्याने स्वच्छता केली. तसेच परिसराचीही स्वच्छता करून घेतली. त्यांच्या या कृतीतून मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलीच चपराक बसली. कंडारी गावात हा विषय चर्चेचा ठरला होता.