म्हसावद एरंडोल रस्ता गेला खड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:51+5:302021-09-04T04:20:51+5:30
शिरसोली : येथून जवळच असलेल्या म्हसावद एरंडोल रस्त्याची म्हसावद गावात अतिशय दुरवस्था झाली असून या रस्त्याने साधे चालणेही ...

म्हसावद एरंडोल रस्ता गेला खड्यात
शिरसोली : येथून जवळच असलेल्या म्हसावद एरंडोल रस्त्याची म्हसावद गावात अतिशय दुरवस्था झाली असून या रस्त्याने साधे चालणेही कठीण झाले असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
नेरी ते एरंडोल रस्त्याचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. तसेच येथील रहदारी सुकर व्हावी यासाठी येथील रेल्वे गेटवर गेल्या सात-आठ वर्षांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वे गेट ते स्टेट बँक व ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून तसेच अर्धवट सोडून देण्यात आले आहे. यामुळे स्टेट बँकेसमोर मोठमोठे खड्डे पडले असून येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखल, खड्ड्यातून वाहनचालकाला मार्गक्रमण करताना जिवाची बाजी लावावी लागते. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी सरपंच गोविंदा पवार, उपसरपंच शीतल चिंचोरे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, महेंद्र चिंचोरे यांच्यासह ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.