वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या २५ नागरिकांचे मीटर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:51+5:302021-08-23T04:19:51+5:30
जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या २५ नागरिकांचे मीटर महावितरणच्या विशेष पथकाने जप्त केले आहे. दोन दिवसांपासून शहरात वीज ...

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या २५ नागरिकांचे मीटर जप्त
जळगाव : वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या २५ नागरिकांचे मीटर महावितरणच्या विशेष पथकाने जप्त केले आहे. दोन दिवसांपासून शहरात वीज मीटर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील मेहरूण, सिंधी कॉलनी व आदर्श नगरमध्ये २५ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे महावितरणच्या तपासणी पथकाला आढळून आले आहे. त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. जर दंडाची रक्कम तीन दिवसात भरली नाही, तर अशा ग्राहकाविरोधात पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महावितरण प्रशासनातर्फे ज्या ग्राहकांना महिन्याला सरासरी ३० ते ३५ पर्यंतच्या रीडिंगनुसार वीजबिल येेते. अशा ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, महावितरण प्रशासनाने प्रत्येक ग्राहकांचे मीटर तपासण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसात महावितरणच्या तपासणी पथकाने मेहरूण, आदर्शनगर, सिंधी कॉलनी व सुप्रीम कॉलनीत मीटरांची तपासणी केली. ‘टॉग टेस्टर’च्या सहाय्याने मीटरांची तपासणी करण्यात येत असून, या तपासणीत सुमारे २५ नागरिकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे. या सर्व नागरिकांची मीटर महावितरणने जप्त केली आहेत.
इन्फो :
१० ते ५० हजारांपर्यंत ठोठावला दंड
महावितरणच्या पथकाला ज्या ग्राहकांंनी मीटरमध्ये फेरफार करून, विजेची चोरी करत असल्याचे आढळून आले आहे. अशा ग्राहकांचे मागील वीजबिल तपासून त्यांना दंड ठोठवण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या ग्राहकांना साधारणत : दहा हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला आहे. तसेच या दंडाची रक्कम भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. जर तीन दिवसात संबंधीत ग्राहकाने दंडाची रक्कम भरली नाही, तर त्या ग्राहका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच दंड भरल्यानंतर त्या ग्राहकाला नवीन मीटरने वीज जोडणी करणार असल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापत्रे यांनी सांगितले.
इन्फो :
पथकात या अधिकाऱ्यांचा समावेश
महावितरणची ही कारवाई मोहिम प्रभारी मुख्य अभियंता फारूख शेख व उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांच्या सुचनेनुसार सुरू आहे. या मोहिमेत जळगाव शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन.बी.चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापत्रे, सहायक अभियंता आश्विनी जयसिंगपुरे, विवेक चौधरी, जयेश तिवारी, उमेश घुगे, चेतन सोनार, गौरव वाघुळदे व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.