मतदानाचा ‘पारा’ वाढला!
By Admin | Updated: February 17, 2017 01:16 IST2017-02-17T01:16:13+5:302017-02-17T01:16:13+5:30
जिल्हा परिषदेसाठी सरासरी 62.79 टक्के मतदान; कडक उन्हाचीही बाळगली नाही तमा

मतदानाचा ‘पारा’ वाढला!
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी जिल्हाभरात 62.79 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 67.40 टक्के मतदान जळगाव तालुक्यात, तर सर्वात कमी 50.89 टक्के मतदान भुसावळ तालुक्यात झाले. दुपारनंतर मतदारांनी केंद्राकडे गर्दी केल्याने अवघ्या दोन तासात 16 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली.
आव्हाणे, ता.जळगाव येथे मतदार यादीमध्ये अनुक्रम नंबर अनेक याद्यांमध्ये शोधूनही न सापडल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक मतदारांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करून मतदानावर बहिष्कार टाकला. आव्हाणे, नशिराबाद या दोन गावांमध्ये तर काही वेळ मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागली. तहसीलदार अमोल निकम यांनी केंद्राला भेट दिली व ग्रामस्थांची समजूत काढली. दुसरीकडे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी नशिराबादला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेतले. त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.
अतिरिक्त ताणामुळे केंद्रप्रमुखाचा मृत्यू
झाडी, ता. अमळनेर येथील ग्रामसेवक व तिथेच बीएलओ म्हणून नियुक्त असलेले लक्ष्मण पुंडलिक बाविस्कर (41, रा. गांधली ता. अमळनेर) यांचा बुधवारी रात्री अतिरिक्त ताणामुळे मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. आचारसंहिता भंगाविषयी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी वरिष्ठ अधिका:यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याने अतिरिक्त ताणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे