मनपातील ‘व्हर्टिकल गार्डन’ सहा महिन्यांतच कोमेजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:37+5:302021-09-17T04:20:37+5:30
निगा न ठेवल्याने लाखोंचा खर्च गेला पाण्यात : ही निधीची उधळपट्टी नाही का ? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

मनपातील ‘व्हर्टिकल गार्डन’ सहा महिन्यांतच कोमेजले
निगा न ठेवल्याने लाखोंचा खर्च गेला पाण्यात : ही निधीची उधळपट्टी नाही का ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मनपाला एकूण ७६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून मनपाच्या मुख्य इमारतीमधील अनेक मजल्यांवर १० लाखांच्या निधीतून व्हर्टिकल गार्डन सहा महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले होते. मात्र, योग्य निगा न ठेवली गेली नसल्याने सहा महिन्यांतच मनपातील ही व्हर्टिकल गार्डन कोमेजून गेली आहे. त्यामुळे १० लाखांचा निधी ऑक्सिजनवर खर्च न होता पाण्यातच गेल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत शासनाने पब्लिक प्लेसेस अर्थात गर्दीच्या ठिकाणांवर प्राणवायू (ऑक्सिजन) निर्मिती वाढावी या उद्देशाने ‘व्हर्टिकल गार्डन’ची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतदेखील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ४० फुटांचे स्टँड तयार करून ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची लागवड केली होती. मात्र, सहा महिन्यांच्या आतच या गार्डनमधील अनेक रोपे कोमजून नष्ट झाली आहेत. मनपाच्या इमारतीच्या आवारात ही हे गार्डन असतानादेखील मनपा प्रशासनाला या गार्डनची देखभालदेखील करता आलेली नाही.
काय होता उद्देश
१. वाढती लोकसंख्या व प्रदूषण लक्षात घेता जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे अमृत अभियांनार्गत गेल्या काही वर्षांपासून हरित क्षेत्रांची निर्मिती केली जात आहे. त्याच्या पुढे जात शासनाने नागरिकांची प्रचंड वर्दळ असलेल्या ठिकाणांची निवड करीत त्या ठिकाणी ‘व्हर्टिकल गार्डन’च्या माध्यमातून ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
२. यासाठी महापालिकेला ७६ लाखांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या १० लाख रुपयांच्या निधीतून मनपाच्या महापौर, आयुक्त, उपायुक्त, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभागाच्या कार्यालय असलेल्या मजल्यांवर हे गार्डन तयार करण्यात आले होते. मात्र, योग्य निगा न ठेवल्याने बऱ्याच मजल्यांवरील हे गार्डन कोमेजून गेले आहे.
७६ लाखांच्या निधीचा खर्चच नाही
हवेच्या शुद्धिकरण कार्यक्रमांतर्गत मनपाला मिळालेला ७६ लाखांचा निधी मनपाकडेच पडून आहे. २०१९-२०२० मध्ये हा निधी मनपाला प्राप्त झाला होता. दोन वर्षे होऊनदेखील मनपाला हा निधी खर्च करता आलेला नाही. याबाबत जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनीदेखील माहिती जाहीर केली होती. गेल्याच आठवड्यात मनपाने डीपीडीसीकडून आलेला निधी खर्च करता आला नसल्याने तीन कोटी रुपयांचा निधी शासनाकडे जमा करण्याचा सूचना दिल्या आहेत. आता पुन्हा शुद्ध हवेच्या या कार्यक्रमांतर्गत मिळालेला निधीही परत जाण्याची शक्यता आहे.
कोट..
व्हर्टिकल गार्डनमधील काही रोपे कोमेजली आहेत. याबाबत पुन्हा देखभाल दुरुस्तीचे आदेश काढले आहेत. तसेच राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतील रक्कम खर्च करण्याबाबत शासनाकडे मायक्रोप्लॅन सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधी योग्य ठिकाणी खर्च करता येईल.
- चंद्रकांत सोनगिरे, मनपा अभियंता