सदस्य ऑफलाईन बैठकीवर ठाम आणि...पुन्हा झाली अधिसभा बैठक स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:22+5:302021-03-28T04:16:22+5:30
जळगाव : विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाची अधिसभा बैठक ही ऑफलाईनच व्हावी म्हणून सदस्यांनी गुरुवारी प्रचंड गोंधळ घातला होता. नंतर ही ...

सदस्य ऑफलाईन बैठकीवर ठाम आणि...पुन्हा झाली अधिसभा बैठक स्थगित
जळगाव : विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाची अधिसभा बैठक ही ऑफलाईनच व्हावी म्हणून सदस्यांनी गुरुवारी प्रचंड गोंधळ घातला होता. नंतर ही बैठक स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, ही बैठक आता ३१ मार्चला ऑनलाईन पद्धतीनेच होईल, असे पत्रक विद्यापीठाने शनिवारी काढल्यानंतर सदस्य पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणत धारेवर धरले. त्यानंतर आता ही सभा पुन्हा स्थगित करण्यात आली असून लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यापीठातील अर्थसंकल्पाची बैठक गुरुवारी, २५ रोजी आयोजित करण्यात आली होती. अत्यंत महत्त्वाची बैठक असताना कुलगुरूंच्या अनुपस्थितीमुळे अधिसभा सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते. नंतर दीड तास बैठकीत गोंधळ सुरू होता. त्यात ही बैठक ऑफलाईन व्हावी, अशी मागणी केल्यानंतर बैठक स्थगित करण्यात आली होती, तर बैठक ही ऑफलाईन घेण्यात येईल, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिसभा बैठक ही ३१ मार्च रोजी सकाळी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे पत्र जारी केले.
बैठक पुन्हा रद्द
बैठक ऑनलाईन होणार असल्याची माहिती अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे व ए. जी. नेहते यांना मिळाल्यानंतर त्यांनी कुलगुरूंशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी बैठक ही ऑफलाईनच घ्यावी, यासाठी पुन्हा धारेवर धरले. अखेर काही वेळानंतर त्यांनी सदस्यांची बाजू समजून घेऊन प्रभारी कुलगुरू यांनी शनिवारी काढलेले पत्र रद्द केले व बैठक स्थगित केल्याचे जाहीर केले. तसेच लवकरच बैठकीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. जोपर्यंत सभा होत नाही, तोपर्यंतच्या खर्चाला सदस्य मंजुरी देतील, असेही सदस्यांनी स्पष्ट केले आहे.
ऑफलाईन बैठक घेण्यात येईल असे प्रभारी कुलगुुरूंनी घोषित केल्यानंतरसुद्धा बैठकीचे इतिवृत्त न पाठवता तत्काळ बैठकीची नोटीस पाठविणे म्हणजे विद्यापीठातील पारदर्शक कारभार हा फक्त भाषणापुरताच खरा असल्याचे सिद्ध झाले.
- एकनाथ नेहते, अधिसभा सदस्य.
कुलगुरूंच्या निर्णयाचा काही अधिकाऱ्यांनी अवमान केला आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
- प्रा. डॉ. गौतम कुवर, अधिसभा सदस्य.
अधिसभा ही ऑनलाईन होणार असल्याचे कळाल्यानंतर प्रभारी कुलगुरू यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करून संपूर्ण बाबी सांगितल्या. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन सभा घेण्याबाबतचे पत्र रद्द केले जाईल, असे सांगितले.
- विष्णू भंगाळे, अधिसभा सदस्य.