जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनलसाठी २९ रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:15+5:302021-08-26T04:19:15+5:30

पालकमंत्र्यांचा पुढाकार : खडसे-महाजन एकत्र येणार; प्राथमिक जागांवर होणार चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा बँकेसाठी लवकरच होणाऱ्या ...

Meeting of all party leaders on 29th for District Bank all party panel | जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनलसाठी २९ रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनलसाठी २९ रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

पालकमंत्र्यांचा पुढाकार : खडसे-महाजन एकत्र येणार; प्राथमिक जागांवर होणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँकेसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलसाठी चाचपणी सुरू झाली आहे. यासाठी मुंबईला २९ रोजी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या बैठकीत जागा वाटपाबाबत बिनविरोध निवडणूक करण्याकरिता देखील प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, गेल्याच आठवड्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती, तर माजी मंत्री गिरीश महाजन यांना देखील या बैठकीत आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याची माहितीही राजकीय सूत्रांनी दिली आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्हा बँकेसाठी सहकार व पणन विभागाने काही दिवसांपूर्वी आदेश काढून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले होते. तेव्हापासून जिल्हा बँकेसाठी राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. गेल्या पंचवार्षिकप्रमाणेच यंदाही जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन, भाजपने देखील स्वबळाची तयारी सुरू केली आहे. यामुळे सर्वपक्षीय पॅनलची तयारी कितपत यशस्वी होते यावर २९ रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वपक्षीयांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य

सर्वपक्षीय पॅनलसाठी जागा वाटपाचे सूत्र तयार झाले होते. मात्र, यामध्ये काँग्रेसला भाजप, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत कमी जागा मिळत असल्याने हा फॉर्म्युला काँग्रेसने फेटाळून आता स्वबळाची तयारी केली आहे. स्वबळाची घोषणा करून सर्वपक्षीय पॅनलमधील जागा वाटपात जागा वाढून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस या बैठकीत सहभाग घेईल का ? याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी या बैठकीबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा फोन आल्याचेही सांगितले.

काय होता जागा वाटपाचा फॉर्म्युला

शिवसेना - ६

राष्ट्रवादी काँग्रेस - ६

भाजप - ६

काँग्रेस - ३

राज्यातील वादाचे उमटतील का पडसाद ?

राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानामुळे शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली होती. या वादामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसह सहकारच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपला जवळ घेईल का ? याकडे लक्ष लागले आहे. या वादाचे पडसाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय पॅनलसाठी प्राथमिक बैठक रविवारी होत असली तरी प्रत्येक पक्षाने याआधी आपल्या पक्षातील इच्छुकांशी चर्चा करून याबाबत स्वबळाचा पर्याय देखील खुला ठेवला आहे.

खडसे-महाजन एकीसाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आणण्याचे शिवधनुष्य आधी उचलावे लागणार आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हे शिवधनुष्य उचलण्याची जबाबदारी घेतली असून, गेल्या आठवड्यात पालकमंत्र्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती, तर गिरीश महाजन यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Meeting of all party leaders on 29th for District Bank all party panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.