महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणार वैद्यकीय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:51+5:302021-09-05T04:20:51+5:30
जळगाव : ‘विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना’ ही खान्देशातील काही महाविद्यालय व परिसंस्था गांभीर्याने राबवित नसल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली ...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणार वैद्यकीय तपासणी
जळगाव : ‘विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना’ ही खान्देशातील काही महाविद्यालय व परिसंस्था गांभीर्याने राबवित नसल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची प्रत्यक्षात वैद्यकीय तपासणी करून, वैद्यकीय अहवाल विद्यापीठाला सादर करण्याच्या सूचना नुकतीच महाविद्यालय व परिसंस्था यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
विद्यापीठाने विद्यार्थी योजनेचा एक भाग म्हणून ‘विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना’ लागू केली आहे. या योजनेंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व शाखेतील प्रथम वर्ष व पदव्युत्तर वर्गाच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची, तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रवेश घेतेवेळी प्रत्येकी २५ रुपये वैद्यकीय शुल्क आकारण्यात येत असते, परंतु खान्देशातील काही महाविद्यालय व परिसंस्था ही योजना गांभीर्याने राबवित नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याच्या काही गंभीर समस्या निर्माण झालेली असल्यास, विद्यार्थ्यास वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास, त्यावेळी तांत्रिक अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यास आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे महाविद्यालय व परिसंस्था यांनी व वसतिगृहे यांना विद्यार्थ्यांची कॅम्पच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहेत.
...अन्यथा दंडात्मक कारवाई
वैद्यकीय तपासणी अर्ज हा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणी अहवाल हा ३१ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाला सादर करावयाचा आहे. विद्यार्थ्यांची तपासणी करून झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फॉर्म भरून घ्यावयाचे आहे, तसेच ज्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल ३१ ऑक्टोबरपर्यंत पाठवावे. हा अहवाल न पाठविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल किंवा परीक्षांचे निकाल रोखून धरण्यात येतील, असे विद्यापीठाच्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.