वैद्यकीय प्रवेश परीक्षा :ढिसाळ नियोजनामुळे संताप
By Admin | Updated: May 19, 2014 01:58 IST2014-05-19T01:58:38+5:302014-05-19T01:58:38+5:30
जळगाव : बाकांवर साचलेली धूळ पंखे बंद अशा वातावरणातच भावी डॉक्टरांना परीक्षा द्यावी लागली. या ढिसाळ नियोजनामुळे पालक संतप्त झाले होते

वैद्यकीय प्रवेश परीक्षा :ढिसाळ नियोजनामुळे संताप
जळगाव : वर्ग खोल्यांमध्ये साचलेला कचरा तसेच बाकांवर साचलेली धूळ...जीवाची लाही लाही होत असताना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही...पंखे बंद अशा वातावरणातच भावी डॉक्टरांना परीक्षा द्यावी लागली. या ढिसाळ नियोजनामुळे पालक संतप्त झाले होते. त्यांनी समन्वयकांना धारेवर धरले, त्यामुळे वातावरण तापले होते. एएमयूपीएमडीसीतर्फे (असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ युनायडेड आॅफ प्रायव्हेट मेडिकल डेंटल कॉलेज) रविवारी खासगी दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुपारी २ ते ५ यावेळेत सीईटी परीक्षा घेण्यात आली. नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींसाठी पाणी, पंख्याची व्यवस्था नसल्याने व तसेच काही वर्ग खोल्यांमध्ये धूळ व कचरा पडल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली. पालक व समन्वयकांत तू-तू-मैं-मंै पेपर सुरू झाल्यानंतर वर्गातील परिस्थितीची माहिती पालकांना मिळाली. त्यानंतर शरद जोशी, राजेंद्र कोल्हे, रियाज अहमद, शरद पाटील (चाळीसगाव) यांच्यासह इतर पालकांनी एएमयूपीएमडीसीचे समन्वयकांना जाब विचारला. पुढील वर्षी दखल घेतली जाईल, असे उत्तर पालकांना मिळाल्यानंतर समन्वयक व पालक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. फोनमुळे वैतागले पालक विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्या...एवढी फी भरावी लागेल...विविध सोयी-सुविधा मिळतील, असा फोन दररोज खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून पालकांना येत असल्याचे पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सीईटी परीक्षेलाच मूलभूत सुविधा मुलांना मिळत नाही तर प्रवेशानंतर काय खाक सुविधा मिळतील? असा संतप्त प्रश्न पालकांनी येथे उपस्थित केला.