महापौरांचा सत्कार आणि सेनेतील दुफडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:44+5:302021-03-04T04:27:44+5:30
वार्तापत्र मनपाच्या शुक्रवारी झालेल्या महासभेआधीच नेहमीच सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेच्या गटनेते अनंत जोशी व व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी ...

महापौरांचा सत्कार आणि सेनेतील दुफडी
वार्तापत्र
मनपाच्या शुक्रवारी झालेल्या महासभेआधीच नेहमीच सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेच्या गटनेते अनंत जोशी व व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौर भारती सोनवणे यांनी केलेल्या कामांबाबत जाहीर सत्कार केला. महापालिकेच्या इतिहासात विरोधकांनी महापौरांचा वाजत-गाजत सत्कार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या सत्कारामागे महापौरांकडून होत असलेल्या मुदतवाढीचे राजकारण असण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी गटनेते अनंत जोशी व प्रशांत नाईक यांनी ही शक्यता खोडून चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हटले पाहिजे, याच नियमाने महापौरांनी चांगले काम केले म्हणून हा सत्कार करण्यात आल्याचे सांगितले आहे. या सत्कारावरून विरोधकांमध्ये प्रथमच कलह वाढला आहे. महापौरांचा सत्कार केला म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नगरसेवकांना समज दिली. त्यानंतर मात्र, दुसऱ्याच दिवशी गटनेते अनंत जोशी यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा देत, पक्षातील काही गोष्टी पक्षातीलच सदस्यांकडून चव्हाट्यावर आणल्या जात असल्याचा आरोप केला. आतापर्यंत सत्ताधारी भाजपमध्येच गटबाजी पहायला मिळाली होती. मात्र, महापौरांच्या सत्कारावरून आता सेनेतील गटबाजी देखील बाहेर आली आहे. दरम्यान, पालकमंत्री व संपर्कप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली असली तरी या मुद्द्यावर ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा , विरोधी पक्षनेते सुनील महाजन व महानगरप्रमुखांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच विरोधी पक्षनेत्यांनीही गेल्या महासभेत महापौरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गटनेत्यांचा रोष कोणत्या नगरसेवकाकडे हे कळू शकले नसले तरी एका सत्कारावरून गटनेते जोशी यांनी दिलेला राजीनाम्यामुळे सेनेत सर्वच काही आलबेल आहे. असे चित्र दिसून येत नाही. दरम्यान, महापौर भारती सोनवणे यांच्या कामाबाबत सुनील महाजन यांनी कौतुक करत, प्रदीप रायसोनी यांच्या नितीने काम करत असल्याचे सांगितले होते. तर जोशी व नाईक यांनी जाहीर सत्कार करून, महापौरांच्या कामांना प्रमाणपत्रच दिले आहे. अशा परिस्थितीतही सेनेत दुफडी तयार का झाली ? यावर चर्चांना उधान आले आहे. मात्र, सेनेकडून महापौर भारती सोनवणे यांच्या मुदतवाढीसाठी काही प्रमाणात का असेना ? हातभार मात्र लावला जात असल्याचे गेल्या महिनाभरातील घडामोडींवर दिसून येत आहे. मात्र, हा हातभार लावताना सेनेत निर्माण झालेल्या दुफडीमुळे महापौरपदाच्या आगामी निवड प्रक्रियेवर काय परिणाम होतो ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.