महापौरांनी स्वीकारला मनपाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:35+5:302021-03-23T04:16:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शिवसेनेच्या जळगाव महापालिकेतील पहिल्या महापौर ठरलेल्या जयश्री महाजन यांनी सोमवारी महापालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारला. संपूर्ण ...

महापौरांनी स्वीकारला मनपाचा कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- शिवसेनेच्या जळगाव महापालिकेतील पहिल्या महापौर ठरलेल्या जयश्री महाजन यांनी सोमवारी महापालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारला. संपूर्ण महापालिका भगवे ध्वज, पट्टे व फुग्यांनी सजवण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीने व ''जय भवानी जय शिवाजी'' च्या घोषणांनी महापौरांचे महापालिकेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरातील नागरिकांचा मुख्य समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महापौरांच्या स्वागतासाठी महापालिकेत शिवसेनेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, मनोज चौधरी, गणेश सोनवणे, अमर जैन, ज्योती तायडे, गजानन मालपुरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेना महिला आघाडीच्यावतीने महापौरांचे औक्षण करून महापालिकेत स्वागत करण्यात आले. यासह महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महापौरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्य समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार - महापौर
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासोबतच सद्यस्थितीत नागरिकांना त्रास होत असलेल्या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या मदतीने ठोस काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. शहराच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन शहरातील लहानात लहान व वाढीव भागातील नागरिकांपर्यंत महापालिकेचा विकास घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, असेही आश्वासन महापौरांनी दिले. अडीच वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे आम्ही आश्वासन देत नसले तरी सद्यस्थितीत असलेल्या शहराचा चेहरा चांगला करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असेही महाजन यांनी सांगितले.
शिवसेनेच्या जल्लोषात ते बंडखोर मात्र गायब
महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर सोमवारी महापालिकेत नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते; मात्र या जल्लोषाच्या कार्यक्रमात भाजपामधून फुटून आलेले ते बंडखोर नगरसेवक मात्र दिसून आले नाहीत.