दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:39 IST2020-10-24T19:39:40+5:302020-10-24T19:39:53+5:30
उत्साह : घरगुती वस्तू, कपडे, यासह फुलांना मोठी मागणी

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली
भुसावळ- साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत विविध घरगुती वस्तू, सोने, आभूषणे, कपडे, यासह झेंडूची फुले खरेदीसाठी नागरीकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कोरोनामुळे सहा महिन्यांपासून थंडावलेल्या बाजारपेठेत यामुळे मोठया प्रमाणावर उत्साह दिसून आला.
रविवारी दसरा असल्याने शनिवारी शहरातील आठवडे बाजार परिसर भागात कपड्यांची दुकाने, घरगुती साहित्यांची दुकाने, टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक दुकानांसह किराणा दुकानांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे कोरोना काळातही या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन होतांना दिसून आले नाही. गर्दीमुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्याही उदभवली.
झेंडूची फुले७० ते ८० रुपये किलो:
दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने, बाजारपेठेत सकाळ पासूनचं झेंडूच्या फुलांना ७० ते ८० रुपये किलो भाव होता. भुसावळसह जामनेर भागातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर फुले विक्रीला आणली होती. तसेच दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष महत्व असल्याने, ही पाने देखील विक्रीसाठी आणलेली होती. १० रुपयांपासूनचं ते २० रुपयांच्या जुड्या तयार करून ही पाने विक्री होत होती. पूजेसाठी 'उसा'लाही मोठी मागणी असल्याने ५० रुपये जोडी प्रमाणे विक्री होत होती.