मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:18+5:302021-05-06T04:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर झालेली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व ...

मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर झालेली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व लेखक डॉ. नरसिंग परदेशी यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त नोबेल फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना परदेशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्राचीन काळापासून सुजलाम सुफलाम राज्य आहे. प्राचीन काळात महाजनपदे ,वाकाटक यांसारख्या संस्कृतीमध्ये मराठी विभाग संपन्न आणि सुखी भूभाग म्हणून ओळखला जातो. मराठी या शब्दाची उत्पत्ती मऱ्हाटी या शब्दापासून झालेली आहे. मराठी मातीमध्ये कालिदासाच्या मेघदूत काव्याच्या लिखाणाचा इतिहास दडलेला आहे. नेवासा, गंगापूर ,नागपूर या ठिकाणी प्राचीन युगाचे अवशेष सापडतात. मराठी मातीने फक्त परकीय आक्रमणे परतवले नसून सांस्कृतिक बदलांनादेखील तोंड दिलेले आहे. मराठी मातीची संत परंपरा जगभर अजरामर आहे. भगवद्गीतेचे मराठी भाषांतर स्थानिक लोकांना समजेल अशा भाषेत संत ज्ञानेश्वरांनी लिखाण करून मराठी भाषेला समृद्ध केलेले आहे. आजपर्यंतच्या भारतीय उपखंडाच्या इतिहासात मराठ्यांनी निर्माण केलेले साम्राज्य इतके मोठे साम्राज्य कोणत्याही राज्यकर्त्यांना करता आलेले नाही.
याप्रसंगी उपायुक्त कपिल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.