मका खरेदी दराच्या चौकशीत हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:31+5:302021-06-19T04:11:31+5:30
महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने भावांतर योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत राज्यभरातील कोणत्याही ...

मका खरेदी दराच्या चौकशीत हेराफेरी
महाराष्ट्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने भावांतर योजना लागू केली होती. या योजनेंतर्गत राज्यभरातील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या शासनाने ठरवलेल्या हमीभावापेक्षा कमी भावात लिलाव झाला तर संबंधित शेतकऱ्याने सहायक उपनिबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज देऊन संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन विकल्या गेलेला मालाच्या व हमीभावाचा जो भाव फरक असेल तो भाव फरक शासन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून देतो अशी योजना आहे. त्या अनुषंगाने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्डी येथील आधार शंकर पाटील व नरेंद्र धनसिंग पाटील यांनी मका विक्रीस आणला होता. या शेतकऱ्यांचा मका प्रति क्विंटल १ हजार २३७ रुपयांप्रमाणे विकला गेला होता. व मक्याचा हमीभाव १ हजार ८५० रुपये जाहीर केला आहे. विक्रीनंतर हमीभावातील भाव फरक ६१३ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे या दोघा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे रीतसर व कायद्याने लेखी अर्ज देऊन तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक यांनी चोपड्यातील सहायक निबंधक के. पी. पाटील यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणाची चौकशी करत असताना चौकशीत सहायक निबंधक यांनी मार्केट कमिटीने शेतकऱ्यांना दिशाभूल करणारा अहवाल सादर केल्याबद्दल मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली असल्याचे संबंधित शेतकरी सांगत आहेत. तसेच कुठलाही शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे हा कायद्याने गुन्हाच आहे. याची पण नोंद चौकशीमध्ये केली तसेच शेतीमाल एफ. ए. क्यू. व नॉन एफ. ए. क्यू व्यापाऱ्यांना ठरवण्याचा अधिकार नाही. हे पण चौकशीत नमूद केले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर प्रत्येक बिलावर नॉन एफ. ए. क्यूचा शिक्का का मारतो ही बाब पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्षात आणून दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती संबंधित व्यापाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यांनी केला आहे. ज्या मार्केटला शेतकऱ्यांच्या जीवावर कोरोना काळात ही एवढा मोठा नफा झाला आहे. त्याच बाजार समितीचे संचालक मंडळ व कर्मचारी शेतकऱ्यांची बाजू न धरता व्यापाऱ्यांचीच बाजू मांडतात. हे कितपत योग्य आहे. सहायक निबंधक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिनियम १९६३ चे ३२ ड नुसार हमीभावापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी केला जात असल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा उपनिबंधक यांनी कारवाई करावी अशी सूचना सहायक निबंधक चोपडा यांनी अर्ज निकाली काढलेला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सचिव वरिष्ठ लिपिक तसेच सहायक निबंधक के. पी. पाटील शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास शेतकरी संघटना व तक्रारदार शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण करतील असे मत शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण गुजर, सचिन शिंपी तालुकाध्यक्ष चोपडा, विनोद धनगर वर्डी, नरेंद्र धनसिंग पाटील वर्डी, तसेच रवींद्र पाटील खडगाव प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :-
माझा मका हमीभावापेक्षा कमी दराने घेतला आहे. मला हमीभाव(१८५०) मिळावा यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे. फरक रक्कम मिळवून देणे जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची असल्याने मला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.
संदीप आधार पाटील, तक्रारदार शेतकरी