शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:11+5:302021-06-26T04:12:11+5:30
चाळीसगाव : खासगी व्यापाऱ्यांकडून चांगला भाव आणि रोख पैसे मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे चक्क पाठ ...

शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांची पाठ
चाळीसगाव : खासगी व्यापाऱ्यांकडून चांगला भाव आणि रोख पैसे मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे चक्क पाठ फिरवली आहे. ज्वारी खरेदीचे २४०० क्विंटलचे उद्दिष्ट मात्र पूर्ण झाले असून, ८० टक्के शेतकरी अजूनही वंचित आहेत. त्यामुळे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे. सर्व शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यात यावी, अशी मागणी तीव्र झाली आहे.
मका व ज्वारी खरेदी करावी. यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने शासकीय खरेदी केंद्राकडे नोंदणी केली होती. तथापि, नोंदणी केल्यानंतरही महिनाभराच्या उशिराने आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत खरेदीला सुरुवात झाली. गुरुवारअखेर २४०० क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मका खरेदीचे उद्दिष्ट ५,४०० क्विंटलचे आहे. मक्याला खासगी बाजारात चांगला भाव मिळत असल्याने विक्रीसाठी नोंदणी करूनही उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे. खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खरेदी केंद्राचे व्यवस्थापक डी. टी. वाघ यांच्यासह भैय्यासाहेब साळुंखे, विकास शिसोदे प्रयत्नशील आहेत.
................ चौकट
ज्वारी उत्पादक शेतकरी वंचित
२६२० रुपये प्रतिक्विंटलने शासकीय केंद्रावर ज्वारी खरेदी केली गेली. एकूण ८२ शेतकऱ्यांकडून २,४०० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली.
चार लाख लोकसंख्या असलेल्या चाळीसगाव तालुक्याला केवळ २४०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले गेले. यामुळे बहुतांश शेतकरी वंचित आहेत. अजूनही ८० टक्के शेतकऱ्यांकडे ज्वारी असून, ती खरेदी केली जावी. खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यामुळेच खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळाले पाहिजे. रब्बीतही पाण्याची उपलब्धता असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे.
----
. चौकट
मका विक्रीसाठी ६५० शेतकऱ्यांची नोंदणी
शासकीय खरेदी केंद्रावर १८५० रुपये प्रतिक्विंटल भावाने मका खरेदी करण्यात येत आहे. खासगी बाजारपेठेत मात्र हा भाव जास्त आहे. खरेदी - विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पैसेही रोख मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राऐवजी खासगी व्यापाऱ्यांना मका विक्रीसाठी पसंती दिली असल्याचे चित्र आहे.
1...एकूण ६५० शेतकऱ्यांनी शेतकरी सहकारी संघातील शासकीय खरेदी केंद्राकडे नोंदणी केली होती.
2...महिनाभरात केवळ १४ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मका मोजून दिला आहे.
3...गुरुवारअखेर ५६० क्विंटल ५० किलो मका शासकीय केंद्राकडून खरेदी करण्यात आला आहे.
महत्त्वाची चौकट ..
...म्हणून 'मका' उत्पादकांची पाठ
शासकीय खरेदी केंद्रापर्यंत मका घेऊन जाण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च करावा लागतो. पुन्हा खरेदी केंद्रावर क्विंटलमागे ५० रुपये खर्चही येतो. खासगी व्यापारी मात्र थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि गावागावात जाऊन मका खरेदी करीत आहेत. यामुळेच शासकीय खरेदी केंद्राकडे मका विक्रीसाठी जाणे टाळले आहे. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी 'लोकमत'ला दिली.
ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी प्रयत्नशील
२४०० क्विंटल हे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट अत्यंत तोकडे असून, मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहिले आहेत. तालुक्यातील सर्व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी केली जावी. उद्दिष्ट वाढवून मिळावे. यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, सहकार व पणन मंत्र्यांसह मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला आहे. शासनाने शेतक्यांची रास्त मागणी लक्षात घेऊन ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे, अशी रास्त मागणी करण्यात आली आहे.
- मंगेश रमेश चव्हाण
आमदार, चाळीसगाव.