महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली : माजी मंत्री आ. गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST2021-05-06T04:16:48+5:302021-05-06T04:16:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता ...

Mahavikas Aghadi betrayed the Maratha community: Former Minister A. Girish Mahajan | महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली : माजी मंत्री आ. गिरीश महाजन

महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली : माजी मंत्री आ. गिरीश महाजन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्यानेच हे घडले आहे. सरकारमध्ये नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

गिरीश महाजन हे बुधवारी दुपारी जळगावात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात असताना ते माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षण आणि महाविकास आघाडीची भूमिका या विषयावर त्यांनी मतप्रदर्शन केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विधानसभेत कायदा केला होता. मागासवर्गीय आयोगही नेमला होता. सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागला. दुर्दैवाने सरकार बदलले. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. तेथे निर्णय बदलला आहे. सुरुवातीपासून या सरकारमध्ये एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या प्रकारे भांडत होते. त्यांचे नेते व मंत्री वेगवेगळी मते मांडत होती. हे आरक्षण होऊ नये असे सरकारमधल्या मंत्र्यांना वाटत होते. नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव असल्याने हे आरक्षण टिकले नाही. कोणाचे कोणाला काहीही माहिती नव्हते. तिन्ही पक्षांमधील विसंगती तसेच वादामुळे हे आरक्षण टिकवण्यात अपयश आले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण टिकले नाही

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमध्ये एकमत होते का, हा प्रश्न आहे. सर्व मंत्र्यांचे वक्तव्य तपासून पाहा, त्यावरून हे लक्षात येईल. कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही, म्हणून हा दुर्दैवी दिवस उगवला. आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही कायम सरकारसोबत होतो आणि आहोत. आमचे नेते चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले होते; पण जे काय करू ते आम्हीच करू, विरोधी पक्षाला सोबत घेणार नाही, ही सरकारची मानसिकता आणि आडमुठेपणा आरक्षणाला नडला, असेही गिरीश महाजन म्हणाले.

Web Title: Mahavikas Aghadi betrayed the Maratha community: Former Minister A. Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.