महाराष्ट्र बँकेत कर्मचाऱ्यांची अरेरावी, ग्राहकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:18+5:302021-05-28T04:14:18+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे महाराष्ट्र बँकेत कर्मचाऱ्यांच्या अरेरावीपणामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. २७ रोजी इच्छापूर-निमखेडी या दोन्ही ...

महाराष्ट्र बँकेत कर्मचाऱ्यांची अरेरावी, ग्राहकांची निदर्शने
मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथे महाराष्ट्र बँकेत कर्मचाऱ्यांच्या अरेरावीपणामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. २७ रोजी इच्छापूर-निमखेडी या दोन्ही गावातील नागरिकांनी जोरदार निषेधपर निदर्शने या ठिकाणी केली.
मुक्ताईनगर तालुक्यात केवळ निमखेडी बुद्रुक येथे एकमेव महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या या ठिकाणी असल्याने दररोज शेकडो ग्राहक हे व्यवहारासाठी येतात. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दररोज बँकेचे कामकाज एक तर उशिरा सुरू होते किंवा कामकाज बंद असल्याचे फलक लावले जातात. यामुळे ग्राहकांची मोठी कुचंबणा होते. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याच कारणावरून २७ मे रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजताच्या सुमारास इच्छापूर येथील विजय भोई हे बँकेत आले. रोखपालांनी अरेरावी करत यांच्याशी हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर माजी सरपंच शिवाजी पाटील यांच्याशीदेखील त्यांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी निदर्शने केली.
याप्रसंगी इच्छापूर गावचे विद्यमान सरपंच गणेश थेटे, निमखेडी गावचे पोलीस पाटील छोटू कांडेलकर यासह मोठ्या संख्येने ग्राहक जमले. दरम्यान, ग्राहकांनी तहसीलदार श्वेता संचेती व आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली
मी रोकड आणण्यासाठी गेलेलो असल्याने सिस्टीम बंदचा फलक लावू नका, असे रोखपालांना सांगितल्यानंतरदेखील त्यांनी ऐकले नाही व सिस्टीम बंदचा फलक लावला. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप झाला. ग्राहकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच बँकेची काही वेळेस येणारी तांत्रिक अडचणदेखील ग्राहकांनी समजून घ्यावी.
- अर्णव कुमार, शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक, निमखेडी बुद्रुक, ता. मुक्ताईनगर