महापुराचा १५ गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:37+5:302021-09-03T04:18:37+5:30
पाचोरा : सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितूर आणि गढद नदीला महापूर आला. यामुळे पाचोरा ...

महापुराचा १५ गावांना फटका
पाचोरा : सोयगाव तालुक्यातील भिलदरी येथील प्रकल्प फुटल्याने तितूर आणि गढद नदीला महापूर आला. यामुळे पाचोरा तालुक्यातील ११ तर भडगाव तालुक्यातील ४ गावांना फटका बसला. यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याची माहिती शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यात नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानीचा अहवाल युद्धपातळीवर सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाचोरा, भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दोन्ही तालुक्यात ५० घरांची पडझड व सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगरदेवळा, कजगाव येथील पूल वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
याशिवाय अनेक गावात वीज तारा तुटून व विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल , तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, गटविकास अधिकारी अतुल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, तालुका कृषी अधिकारी बी.बी. बोरुडे, कार्यकारी अभियंता शाम दासकर, न.प. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगाव प्रभारी तहसीलदार मुकेश हिवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दीपक पाटील, भूमिअभिलेखचे एस. आर. ठाकरे, भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी अधिकारी उपस्थित होते.