गौरींची थाटात महापूजा व पंचपक्वान्नांचा नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:40+5:302021-09-14T04:20:40+5:30
पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण प्रसाद धर्माधिकारी नशिराबाद : सुखसमृद्धीसह वैभव व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी अर्थात गौराईची ...

गौरींची थाटात महापूजा व पंचपक्वान्नांचा नैवेद्य
पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण
प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद : सुखसमृद्धीसह वैभव व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी अर्थात गौराईची सोमवारी थाटात महापूजा संपन्न करीत साग्रसंगीत पंचपक्वान्नासह पुरणपोळीचा महानैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला. गौरींच्या स्थापनेमुळे घरोघरी भक्ती चैतन्याचे वातावरण होते.
सोमवारी ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मी गौरींचे षोडशोपचार पूजन करून श्रीसुक्ताने महाभिषेक पूजन करण्यात आले. देवीला विविध प्रकारची पत्री पुष्प अर्पण करीत विविध अलंकारांनी सजविण्यात आले होते. अनेक ठिकाणी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. देवीच्या समोर धान्याच्या राशी मांडण्यात आल्या होत्या. खणा-नारळाने देवीची ओटी भरून सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यात आली.
वरण-भात-भाजी-पोळी, सोळा प्रकारच्या भाज्या, चटणी कोशिंबीर, पंचामृत, ताक व ज्वारीच्या पिठापासून बनलेले आंबील, सांजोरी, करंजी, पुरणपोळी, खीर, कढी, भजे, वडे आदी साग्रसंगीत पंचपक्वान्नाचा महानैवेद्य महालक्ष्मी गौरींना अर्पण करण्यात आला. देवीला तांबूल देत महाआरती झाली. त्यानंतर कुटुंबातील परिवारातील सदस्य व नातलगांच्या महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाले. गौरींना महापूजामध्ये महत्त्व असलेले केवडा, कमळ, पडवळ, गजरा, जास्वंदासह विविध पत्री देवीला अर्पण करण्यात आली.
आज विसर्जन
भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर आवाहन. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन महानैवेद्य अर्पण करून या उत्सवाची सांगता मूळ नक्षत्रावर होत असते. आज मंगळवारी गौरींना पारंपरिक पद्धतीने दूध, कानोल्यांचा नैवेद्य अर्पण करून विसर्जन करण्यात येईल.