एम. एस्सी. झालेला तरुण कर्जामुळे झाला चोर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:42+5:302021-09-14T04:20:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : गस्तीवर असलेल्या पोलिसांना आढळलेला धरणगाव तालुक्यातील संशयित तरुण अट्टल मोटरसायकल चोर असल्याचे उघडकीस ...

M. Ess. The young man became a thief due to debt! | एम. एस्सी. झालेला तरुण कर्जामुळे झाला चोर !

एम. एस्सी. झालेला तरुण कर्जामुळे झाला चोर !

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : गस्तीवर असलेल्या पोलिसांना आढळलेला धरणगाव तालुक्यातील संशयित तरुण अट्टल मोटरसायकल चोर असल्याचे उघडकीस आले आहे. त्याने पुणे, जळगाव, अमळनेर, धरणगाव येथून सहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. या चोरट्याकडून तीन मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. एम. एस्सी. झालेला हा तरुण कर्जामुळे चोरीकडे वळला आहे.

खेमचंद तुकाराम पाटील (रा. सोनवद, ता. धरणगाव) असे या तरुणाचे नाव आहे. अमळनेरात दोन दिवसांपूर्वी रात्री हेडकाॅन्स्टेबल सुनील हटकर व राहुल पाटील हे गस्तीवर होते. यावेळी एक तरुण मोटरसायकलने धरणगावकडे जाताना आढळून आला. त्याच्याकडे कागदपत्रे मागितली असता त्याने ती दिली नाहीत. पोलिसांनी त्याच्या मोटरसायकलच्या क्रमांकाची नोंद घेऊन त्याचा मोबाईल क्रमांक आणि फोटो काढून त्याला जाऊ दिले. दुसऱ्या दिवशी त्या मोटरसायकलची माहिती घेतली असता, मालकाचे नाव दुसरेच आढळले. संबंधित मालकाला विचारणा केल्यावर दोन दिवसांपूर्वी जळगाव येथील गोलाणी मार्केटमधून त्याची मोटरसायकल चोरीला गेल्याचे सांगितले.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताबडतोब हेडकाॅन्स्टेबल सुनील पाटील, पोलीस नाईक शरद पाटील, प्रमोद पाटील, राहुल पाटील यांना सोनवद गावी पाठवून खेमचंदला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवला असता, त्याने खोटे नगर व गोलाणी मार्केट, प्रताप महाविद्यालय, चाकण धरणगाव व अमळनेर येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

आरोपी सुशिक्षित ! कर्जामुळे झाला चोर !

खेमचंद हा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तरुण आहे. तो खासगी शिकवणी घ्यायचा. त्याची आई मयत असून, घरी म्हातारे वडील आहेत. खेमचंद याने धरणगाव येथील मित्रांकडून पैसे उसने घेतले होते. एकाकडे त्याने आपले गुणपत्रक गहाण ठेवले होते, एकाकडे त्याने मोटरसायकल गहाण ठेवली होती. ही मोटरसायकलदेखील चोरीची असल्याचे उघडकीस आले. त्याचे नातेवाईकांच्या मुलीशी लग्न ठरले होते, मात्र ते मोडल्याचे समजते. खेमचंद हा बेरोजगार आणि कर्जबाजारी असल्याने या मानसिक तणावातून चोरीकडे वळल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

कोट

आरएफआयडी यंत्रणा कार्यान्वित झाल्याने पोलीस प्रत्येकाची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला. यातून आणखी चोऱ्या उघडकीस येतील.

- जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर

फोटो ओळी : चोरी केलेल्या तीन मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (छाया - अंबिका फोटो)

Web Title: M. Ess. The young man became a thief due to debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.