प्रेमीयुगलाचे शव पाण्याच्या खड्ड्यात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 05:33 PM2019-10-04T17:33:35+5:302019-10-04T17:38:09+5:30

वीटभट्टीलगत पाण्याच्या १५ फूट खोल खड्ड्यात शुक्रवारी सकाळी प्रेमीयुगलाचे मृतदेह आढळले.

Lover's body was found in a water pit | प्रेमीयुगलाचे शव पाण्याच्या खड्ड्यात आढळले

प्रेमीयुगलाचे शव पाण्याच्या खड्ड्यात आढळले

Next
ठळक मुद्देपाळधी येथील घटनादुचाकीवरून जाताना घसरली असल्याचा अंदाज

पथराड/पाळधी, ता.धरणगाव, जि.जळगाव : पाळधी येथील वीटभट्टीलगत पाण्याच्या १५ फूट खोल खड्ड्यात शुक्रवारी सकाळी प्रेमीयुगलाचे मृतदेह आढळले. खड्ड्याजवळून जाताना दुचाकी पाण्यात घसरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. प्रिया दत्तात्रय पाटील (वय १७, रा.पाळधी, ता.धरणगाव) आणि जयेश दत्तात्रय पाटील (वय १९, रा.नशिराबाद, ता.जळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
पाळधी येथे चांदसर रोडलगत अनिल कासट यांच्या वीटभट्टीलगत खोल खड्ड्यातील पाण्यात प्रेमीयुगलाचे शव तरंगताना वीटभट्टी कामगार अर्जुनसिंग बारेला यास आढळले. वीटभट्टीमालक अनिल कासट यांनी पाळधी पोलिसांना कळविले. पाळधी पोलीस स्टेशनचे सपोनि हनुमंत गायकवाड व सहकारी घटनास्थळी पोहोचले व ही माहिती प्रभारी स.पो.नि.पवन देसले यांना देण्यात आली.
पाळधी पोलिसांनी दोघे शव व सोबत दुचाकी पाण्यातून बाहेर काढल्यावर गावातील लोकांनी मुलीला ओळखले. पोलिसांनी दोघांच्या आईवडिलांना ही माहिती दिली व शव जळगाव येथे शवविच्छेदनासाठी रवाना केले.
सूत्रांनुसार, पाळधी येथील मुलगी २ आॅक्टोबर रोजी बेपत्ता होती. शोधाशोध केल्यावर मिळाली नाही. तेव्हा तिच्या वडिलांनी ३ रोजी पाळधी पोलिसात मुलीला कोणीतरी फुस लावून घेऊन गेल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, मुलीचे नाव प्रिया दत्तात्रय पाटील (वय १७, रा.पाळधी, ता.धरणगाव) असून, मुलाचे नाव जयेश दत्तात्रय पाटील (वय १९, रा.नशिराबाद, ता.जळगाव) आहे. त्यांचे प्रेमसंबंध होते. जयेश हा २ रोजी जळगाव येथून मित्राची दुचाकी घेऊन पाळधी येथे आला. मुलीने जळगावला कॉलेज जात असल्याचे सांगितले व मुलासोबत पाळधी परिसरात फिरत राहिली. वीटभट्टी बंद असल्याने या परिसरात कोणीच जात नाही. हे दोघे तेथेच भेटत असल्याचा कयास लावला जात आहे. पाण्याच्या खड्ड्याजवळून दुचाकी घेऊन जात असताना गाडीचा तोल गेल्याने दोघे खड्ड्यात पडले व मयत झाले असावेत, असा अंदाज लावला जात आहे. याबाबत पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पवन देसले व हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अरून निकुंम, सुमित बोरसे, विजय चौधरी, नीलिमा हिवराळे करीत आहे.

Web Title: Lover's body was found in a water pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.