हरवलेली जत्रा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:38+5:302021-09-23T04:18:38+5:30

- रमेश पवार, अमळनेर स्ट्रीप- सहज सुचलं म्हणून हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबाॅम्ब पडल्यावर जग जेवढं हादरलं, भयभीत झालं ...

Lost Fair ... | हरवलेली जत्रा...

हरवलेली जत्रा...

- रमेश पवार, अमळनेर

स्ट्रीप- सहज सुचलं म्हणून

हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबाॅम्ब पडल्यावर जग जेवढं हादरलं, भयभीत झालं नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जग हादरलं, भयभीत झालं, कोरोना येण्यानं. गेल्या दीड वर्षाचा हा काळ खूपच वेदनादायी!

माणसं जवळ घ्यावीत, संवाद व्हावा, मायने मुलाच्या जावळाला वरून हात फिरवावा, बापानं पोराच्या पाठीवर शाबासकीची थाप मारावी, माणसामाणसांतलं अंतर कमी व्हावं, माणसं मनानं नि शरीरानं जवळ यावीत, कळकळून मिठी मारावी, हा वैश्विक भाईचारा आणि तत्त्वज्ञान एका कोरोनाने हिरावून घेतले.

माणूस माणसापासून दूर गेला. जवळची, नात्याची, मैत्रीची माणसं दूर गेली. कोरोनाने मानवी भावभावनांची करुणाच हरवून नेली.

खूप खूप हरवून बसलो आपण...यात माझ्या गावची जत्राच हरवून बसलो.

या पडझडीच्या दिवसांत वैशाखी पौर्णिमेची संत सखाराम महाराजांची जत्रा. प्रतिपंढरपूर-

चंद्रभागेसारखी वाहणारी बोरी नदी, कथाकीर्तनाची मांदियाळी, गुळाची जिलेबी, मौत का कुवाँ, थालीपीठ, दशम्या, कळण्याची भाकरी नि मिरचीचा ठेचा घेऊन बोरी नदीच्या पात्रात मऊशार वाळूत रात्रीच्या स्नेहभोजनाचा आस्वाद, असे ते दिवस...

अमळनेरलगत धार गावाचा उरूस - रस्त्यावरून हिंदू-मुस्लिम बांधवांची चालणारी मुंग्यांसारखी रांग. कपिलेश्वरच्या महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी, वर्षभरातून एकदाच दर्शनासाठी खुल्या अंतुर्लीच्या कार्तिकी स्वामींची जत्रा, करणखेड्याचा रथोत्सव, बोरी नदी काठावरचा दगडी घाट, भव्य राममंदिर, तिथला रथोत्सव, बोरीपात्रातील डांगर, टरबूज आणि वैशाख वणव्यातही हिरवेपण जपणारं नातं हरवलं कुठं?

जागतिक पातळीवर अमळनेरची नवी ओळख सांगणारं मंगळदेव ग्रहमंदिर म्हणजे अमळनेरनगरीच्या मुकुटात जणू एक कोहिनूर हिराच!

सणासुदीला आणि दर मंगळवारी मंगळ ग्रहमंदिराला आलेले जत्रेचं रूप- स्वरूप असं कसं दुरावलं? जवळच अंबऋषी टेकडीच्या विलोभनीय हिरवळीत विसावलेली, आषाढी द्वादशीला रिमझिम पावसात चिखलात मातीशी नातं जपणारी,

मनाला आनंद देणारी जत्रा. रिमझिम पाऊस, गुळाची जिलेबी, गरमागरम भजी, सानुल्यांचा भोंगा नि रंगीबेरंगी फुग्यांत रमणारं बालपण.

आषाढ, श्रावणात आजूबाजूला गावागावांत मरीआईचा भंडारा

...सारं गाव कसं मोहरून जायचं!

आंब्याला आलेल्या बहरागत. गावात तमाशाचा फड यायचा. गाव रातभर जागून तमाशा बघायचा. जिवंत कला - पोटासाठी पोटतिडकीने आतून आलेली. गावागावांची जत्रा गेली नि तमाशा कलावंतांसाठी फक्त वेदनेची मात्रा शिल्लक राहिली.

संवाद मौज मस्त मनमुराद आनंद भावभावनांचं देणंघेणं, लहानापासून मोठ्यापर्यंत एका धाग्यात गुंफणारी, माणसांची जत्रा ! कशी हरवली?

खरंतर, नित्य नसतंच काही, येत राहील, जात राहील... भरती-ओहोटी, अंधार-प्रकाश, पानगळ-वसंत चालत राहतील तशीच माणसाची जत्रा आणि जत्था चालत राहील. डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, डाक, बँक कर्मचारी, सेवाभावी माणसं जीव धोक्यात घालून लढतील. संपवून टाकतील कोरोना.

त्यांच्या डोळ्यांत तर बुद्धांची करुणा. त्या करुणेतून माणसांचा जत्था चालत राहील, जत्रा भरत राहील. जत्रा थोडी थांबली... पण, संपली नाही...!

Web Title: Lost Fair ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.