अवघ्या १० मिनिटात लुटला साडेअकरा लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:13+5:302021-07-08T04:13:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यावल : चार दरोडेखोर सराफ दुकानात घुसले आणि घुसताबरोबरच त्यांनी आधी दुकानाने दोन्ही शटर बंद केले ...

Looted Rs 11.5 lakh in just 10 minutes | अवघ्या १० मिनिटात लुटला साडेअकरा लाखांचा ऐवज

अवघ्या १० मिनिटात लुटला साडेअकरा लाखांचा ऐवज

लोकमत न्यूज नेटवर्क

यावल : चार दरोडेखोर सराफ दुकानात घुसले आणि घुसताबरोबरच त्यांनी आधी दुकानाने दोन्ही शटर बंद केले अन्‌ अवघ्या १० मिनिटांच्या थरारमध्ये सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लांबवला.

बाजीराव काशिदास कवडीवाले या जगदीश कवडीवाले यांच्या सराफ दुकानात चार दरोडेखोरांनी बुधवारी दुपारी एकला साडेअकरा लाखांचे दागिने लुटून नेल्याने खळबळ उडाली अहे.

दरोडेखोर नदीमार्गे पसार

मोटारसायकलवरील तिघेजण नगरपालिका व कोर्टच्या मागील हाडकाई नदीपात्रातून पसार झाले आहेत, तर एक जण धोबी वाड्यातून कुठे पसार झाला हे समजू शकले नाही. शहरातील कोणत्या सीसी कॅमेऱ्यात तो दिसून येईल यावरूनही पोलिसांचा तपास सुरू आहे.

कट्ट्यातून गोळी सुटली नाही

घटनास्थळावरून दरोडेखोर एकाच मोटार सायकलवर बसून पसार होत असताना दुकानमालक जगदीश कवडीवाले यांनी आरडाओरड करीत त्यांचा पाठलाग केला. तेव्हा शेजारीच राहत असलेले राजेश श्रावगी हे त्यांच्या मदतीला आले. तेव्हा दरोडेखोरांची दुचाकी घसरली व दोन देशी कट्टे खाली पडले. ते सोडून दरोडेखोरांनी पुन्हा पळ काढला. या दोघांची आयडीबीआय बँकेजवळ पुन्हा झटापट झाली. तेव्हा दरोडेखोरांनी श्रावगी यांच्या मानेवर देशी कट्टा ठेवून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीतून सुदैवाने गोळी सुटली नाही. त्यातील एक दरोडेखोर मोटार सायकलवरून उतरून त्याने येथील धोबी वाड्यातील भोईटे यांचे घरात घुसून घराचे पाठीमागील दाराने पसार झाला तर तिघे जण मोटार सायकलवरून नगरपालिकेकडे गेले.

एका दरोडेखोर सीसी कॅमेऱ्यात कैद

माजी नगराध्यक्ष दीपक बिहाडे यांच्या घराजवळील संजय नेवे यांनी घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यातील एक जण पळताना कैद झाला आहे. त्याच्या कपड्यावरूनच पोलीस शोध घेत आहेत.

तोंडाला बांधलेले होते स्कार्फ

चारही दरोडेखोरांनी आपल्या तोंडास स्कार्फ बांधलेले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे सांगता आले नाहीत. मात्र दुकानात आल्यानंतर त्यांनी मराठी भाषेत संभाषण केले. त्यावरून ते मराठी असावेत असा अंदाज आहे.

शहरातील याच रस्त्यावर सोन्याच्या पिढीची सात दुकाने आहेत. यापैकी कवडीवाले यांचे दुकान सर्वात शेवटी आहे. या रस्त्यावर उच्चभ्रू वस्ती असल्याने दुपारी हा रस्ता सामसूम असतो. तसेच कवडीवाले यांच्या दुकानाच्या लगतच सिनेमा टॉकीज मार्गे रस्त्यावर जाता येते. चोरट्यांनी घटनेनंतर पळून जाण्यासाठी या सर्व बाबीचा अभ्यास करूनच कवडीवाले यांच्या दुकानावर हा दरोडा टाकला असण्याची शक्यता चर्चिली जात आहे.

चिंतेचा विषय

भरदिवसा झालेली ही जबरी चोरी शहरात गेल्या काही दिवसा काही वर्षात प्रथमच झाली आहे. या रस्त्यावर सोन्याची अनेक दुकाने तसेच पतपेढी व बँका असल्याने झालेली ही घटना चिंताजनक आहे.

बाजीराव काशिदास कवडीवाले संचालक जगदीश कवडीवाले हे यावल शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

पोलिसांची फिरती गस्त असावी

भरदिवसा अत्यंत गजबजलेल्या वस्तीत सराफा पेढीवर पडलेला हा दरोडा अत्यंत भीतीदायक आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी भुसावळ, जळगाव येथे सराफ बाजारात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून सराफ बाजारास पोलीस बंदोबस्त देण्यासंदर्भात निर्देश दिले होते, मात्र काही दिवसांनी लगेच तो बंदोबस्त बंद केला. सराफ बाजारसह व्यापारीपेठेत दुपारच्या वेळी पोलिसांची फिरती गस्त असावी, अशी मागणी येथील अभय अरविंद देवरे या सराफ व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.

पाच पथक विविध भागात रवाना

जबरी चोरीप्रकरणी तीन स्थानिक पोलीस पथकांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन असे पाच पथक विविध भागात तपासासाठी रवाना करण्यात आले आहेत.

जबरी चोरीचा गुन्हा दाखल

येथील बाजीराव काशिदास कवडीवाले सराफपेढी जबरी लूटप्रकरणी पेढीचे संचालक जगदीश कवडीवाले यांनी सायंकाळी फिर्याद दिली. त्यानुसार, २४० ग्रॅम वजनाचे सोने व ५५ हजार रुपये रोकड असा ११ लाख २६ हजार ६७५ रुपये अज्ञात चोरट्यांनी जबरीने चोरून नेले. यावरून चार अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह आर्म एक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, फौजदार जितेंद्र खैरनार, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे, गोरख पाटील व सहकारी तपास करीत आहेत.

चहूबाजूने तपास सुरू

शहरात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांच्या वतीने हेच चोरटे खासगी सीसी कॅमेऱ्यामध्ये चोरटे कुठून कुठे आले व कुठे गेले, ते दिसून येतात का याचा शोध पोलीस घेत आहोत, असे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी सांगितले. यापूर्वीही चोरटे या परिसरात येऊन गेले का याचाही शोध घेत आहेत.

१७ वर्षांनंतरची ही दुसरी चोरी

गेल्या १७ वर्षांतील कवडीवाले यांच्या दुकानातील ही दुसरी चोरी आहे. सन २००२ मध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकान फोडून सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यानंतर ७ जुलै रोजी सुमारे १२ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गेल्या वर्षी सन २०१९ ला अज्ञात चोरट्यांनी हेच दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

Web Title: Looted Rs 11.5 lakh in just 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.