अटकेतील व्यक्तींवर एक नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:15+5:302021-06-18T04:12:15+5:30
भागवत भंगाळे हे शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिक असून, त्यांची मद्याची एजन्सी आहे. त्याशिवाय त्यांनी काही वर्षांपूर्वीच सराफ व्यवसायात पाऊल ...

अटकेतील व्यक्तींवर एक नजर
भागवत भंगाळे हे शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिक असून, त्यांची मद्याची एजन्सी आहे. त्याशिवाय त्यांनी काही वर्षांपूर्वीच सराफ व्यवसायात पाऊल टाकले आहे. भंगाळे गोल्ड नावाने आलिशान शोरूम आहे. शहरात भजे गल्ली, रेल्वे स्टेशन परिसरात त्यांच्या हॉटेल्स व बार आहेत. मूळचे ते जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवासी आहेत. आमदार, नगरसेवक, माजी महापौर यांंसह वैद्यकीय क्षेत्रातही त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कार्यरत आहेत.
२) प्रेम कोगटा
प्रेम कोगटा हे दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांची स्वत:ची दालमिलदेखील आहे. सध्या बीएचआरचे मुख्य कार्यालय असलेली जागा कोगटा यांची होती, त्यांनी ती बीएचआरला विक्री केली आहे.
३) संजय तोतला
संजय भगवानदास तोतला हा शाहू नगरात वास्तव्याला असून, मुंबईतही आलिशान घर आहे. तेथेच ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. पाळधी येथे त्यांचा पेट्रोल पंप आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील अंतिम तोतला यांचे भाऊ आहेत.
४) जयश्री मणियार
जयश्री शैलेश मणियार उद्योजक श्रीकांत मणियार यांच्या सून आहेत. पाळधी येथे महामार्गावर मणियार प्लास्ट नावाची त्यांची कंपनी होती. आता ही कंपनी बंद असून, श्रीकांत मणियार यांचा मुलगा सर्वज्ञ यांनी ती आफ्रिकेत सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वीत सर्वज्ञ यांचा तेथे खून झाला होता. शैलेश हे जळगाव व पाळधी येथे वास्तव्याला असतात.
५) जयश्री तोतला
जयश्री अंतिम तोतला स्टॅम्प व नाफ्ता घोटाळ्यातील अंतिम तोतला याच्या पत्नी आहेत. सध्या त्यांचे मुंबईत वास्तव्य असून, पाळधीचे ते भाचे आहेत. जयश्री यांना मुंबईतूनच अटक करण्यात आली आहे.
६) राजेश लोढा
राजेश लोढा हे तळेगाव (ता. जामनेर) येथील माजी सरपंच आहेत. त्यांची तळेगावात इंग्लिश मिडियम स्कूल असून, किराणा व्यावसायिक आहेत. भाजप तथा विशेष करून आमदार गिरीश महाजन यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत. कापसाचाही ते व्यापार करतात.
७) छगन झाल्टे
छगन झाल्टे हे जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. जामनेर नगरपालिकेत त्यांचा मुलगा भाजपचा नगरसेवक आहे. आमदार गिरीश महाजन यांचे ते खंदे समर्थक असून, तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.
८) जितेंद्र पाटील
जितेंद्र पाटील हे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे एका गटाचे सचिव आहेत. या संस्थेत दोन गट असल्याने दोन सचिव आहेत. पत्नी संध्या पाटील या भाजपच्या नगरसेविका आहेत. जितेंद्र पाटील यांची मिनि गिरीश महाजन अशी तालुक्यात ओळख आहे. आमदार महाजन यांच्या अनुपस्थितीत तेच सर्व कामकाज पाहतात.
९) आसिफ तेली
आसिफ तेली हा भुसावळातील माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मुन्ना इब्राहीम तेली यांचा मुलगा आहे. बांधकाम व्यवसायात तो सक्रिय आहे. बांधकामाचे कंत्राटही तो घेतो. लहान मुलगा आशिक राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तर मुन्ना तेली सध्या भाजपचे गटनेते होते. मुलाच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर त्यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला होता.
--