लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘लोकमत’ने आता काळाची गरज ओळखून रक्तदानाची महाचळवळ हाती घेतली आहे. लोकमतने आजपर्यंत विविध उपक्रमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
लोकमतचे संस्थापक संपादक, थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचे नातं’ या महाअभियानाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता रेडक्रॉस रक्तपेढी येथे थाटात शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाभरात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, रेडक्रॉस रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मानद सचिव विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनी मेमन, जैन उद्योग समुहाचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, लोकमत जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
शिवसेनेच्यावतीने या रक्तदान अभियानाला सहकार्य करू, तसेच नागरिकांनीही त्यांची जबाबदारी म्हणून रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. लोकांची भीती दूर झाली असून, जनजागृती झाल्याने आता लोक रक्तदानासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जयंती खऱ्या अर्थाने साजरी : पोलीस अधीक्षक
स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त हा समाजोपयोगी उपक्रम राबविणे स्तुत्य असून, खऱ्या अर्थाने या दिनाचे सार्थक झाल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. आगामी काळात रक्ताचा तुटवडा जाणवणार असल्यास हे शिबिर हा तुटवडा भरून काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रक्तदानाची क्रांती घडू शकते : जिल्हाधिकारी
लोकमतच्या रक्तदान चळवळीतून रक्तदानाची क्रांती घडू शकते, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले. रक्तदान तर होईलच यासह मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन लोकांना यातून रक्तदानाचे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. ‘लोकमत’च्या या चळवळीला रेक्रॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळेल, अशा सदिच्छा जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
लोकमतचा स्तुत्य उपक्रम : महापौर
लोकमतने भविष्यातील रक्ताची गरज ओळखून राज्यभरातून ५० हजार बॅग रक्त संकलित करण्याचा केलेला संकल्प हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केले. यातून लोकांना रक्तदानाचे खरे महत्त्व समजणार असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.
रेडक्रॉसमध्ये सुरक्षित रक्त : डॉ. रेदासनी
रेडक्रॉस सोसायटीत नॅट प्रमाणित व अत्याधुनिक पद्धतीने तपासणी केलेले सुरक्षित रक्त उपलब्ध राहणार असल्याचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. ‘लोकमत’चे हे अभियान कौतुकास्पद आहे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता त्या त्या ठिकाणी रेडक्रॉसची टीम पोहोचणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रेडक्राॅसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात कार्यकारी संपादक रवी टाले यांनी ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानामागची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले, तर सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले. रक्तसंकलनासाठी डॉ. पी. बी. जैन, अनिल भोळे, सीमा शिंदे, रवींद्र जाधव, कामरान शेख यांनी सहकार्य केले.