लोक संघर्ष मोर्चाचे वाढत्या महागाईविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:47+5:302021-07-09T04:11:47+5:30
जळगाव : लोकसंघर्ष मोर्चाने पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल घरगुती गॅस सिलिंडर यांच्या दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १० ...

लोक संघर्ष मोर्चाचे वाढत्या महागाईविरोधात आंदोलन
जळगाव : लोकसंघर्ष मोर्चाने पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल घरगुती गॅस सिलिंडर यांच्या दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १० ते १ यावेळेत आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महागाईविरोधात निवेदन देखील देण्यात आले. तसेच दुपारी १ वाजता जोराने हॉर्न वाजवून महागाईविरोधात बिगुल फुंकण्यात आला.
संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने देशभरात वाढत्या महागाईविरोधात निषेध म्हणून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून जळगावमध्ये लोकसंघर्ष मोर्चाने आंदोलन केले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणादेखील दिल्या.
यावेळी सचिन धांडे, फारुक कादरी, भरत कर्डिले यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. एक वाजता हॉर्न वाजवून महागाईविरोधात बिगुल वाजवण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरीविरोधी तीन कायदे सरकारने पारीत केले आहेत. ते तत्काळ रद्द करण्यात यावेत. सर्व पिकांना हमीभाव मिळावा तसेच कोरोनामुळे ज्यांनी परिवारातील कर्ता व्यक्ती गमावला आहे. त्यांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. तसेच परिवारातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे.
कोरोना काळात महागाई वाढली आहे. मूलभूत गोष्टींची किंमत वाढल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महागाई तत्काळ कमी करावी, या आंदोलनात सचिन धांडे, भरत कर्डिले, फारुक कादरी, नाना महाले, अमोल कोल्हे, प्रितपाल सिंग, अकील खाँ कासार, मुकेश सावकारे, विनोद अढाळके, आरिफ देशमुख, ज्ञानेश्वर सोनवणे, सुमित साळुंके, दामू भारंबे, अजय पावरा, कलिंदर तडवी, अजय मनोरे, विकास वाघ, देवीदास पारधी, कैलास मोरे उपस्थित होते.