कोविड तपासणी केंद्राला कुलूप, नागरिक बसले ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:21+5:302021-03-04T04:29:21+5:30
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा हळूहळू वाढत असल्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे़ परिणामी, आता थोडे फार सुध्दा ...

कोविड तपासणी केंद्राला कुलूप, नागरिक बसले ताटकळत
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा हळूहळू वाढत असल्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे़ परिणामी, आता थोडे फार सुध्दा लक्षणे जाणवू लागली की नागरिक तपासणीसाठी केंद्रांवर गर्दी करीत आहे. त्यातच बुधवारी सकाळपासून शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) येथील केंद्रावर कोविड तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, दहा वाजूनसुध्दा केंद्राला कुलूप असल्याने नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागल्याचा प्रकार घडला. दरम्यान, केंद्राची जी वेळ आहे, त्याच वेळेला केंद्र सुरू झाले असल्याचे कोविड तपासणी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मागील वर्षी कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले होते. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. आता पुन्हा हा प्रादुर्भाव वाढत असून दररोज वीस ते तीस बाधित रुग्ण आढळून येणारी संख्या चारशेवर पोहोचली आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्याही वाढली असून अॅन्टीजेन व आरटीपीसीआर केंद्रांवर कोविड तपासणीसाठी रांगा लागत आहेत. बुधवारी शासकीय पॉलिटेक्निक येथे कोविड तपासणी केंद्रावर सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिक तपासणीसाठी आले होते़ गर्दी वाढल्यामुळे मोठी रांग लागली होती. केंद्रातील कर्मचारी सुध्दा हजर झाले होते. मात्र, दहा वाजूनसुध्दा केंद्राला कुलूप असल्यामुळे नागरिकांसह वयोवृध्दांना ताटकळत बसावे लागले. कर्मचाऱ्याने चावी आणल्यानंतर केंद्र उघडण्यात आले. नंतर नोंदणीला सुरुवात होऊन चाचणी करण्यात आली.
सकाळी दहा वाजता केंद्र सुरू होण्याची वेळ आहे. त्यावेळेवरच केंद्र सुरू होऊन नोंदणी केली गेली. नंतर नोंदणी झालेल्या नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आली. सकाळपासूनच केंद्रावर तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी होत आहे.
- संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा