तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्रांची सूची जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:05+5:302021-05-18T04:17:05+5:30
जळगाव : तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रांची सूची तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप ...

तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्रांची सूची जाहीर
जळगाव : तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रांची सूची तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप कुठल्याही सूचना नसल्या तरी विद्यार्थ्यांनी संबंधित प्रमाणपत्र जमा करून घेण्याचे सूचित केले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष एसएससी पदविका अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम, तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष वास्तुशास्त्र, बी प्लॅनिंग पदवी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एम. ई., एम.टेक, एम.फार्म, डी. फार्म, एमबीए, एमएमएस, एमसीए, आदी अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करताना लागणारी आवश्यक प्रमाणपत्रांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता शासनाकडून करण्यात आलेली नाही. मात्र, ऐनवेळी विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी आधीच प्रमाणपत्र जमा करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी असे आहेत आवश्यक प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहित केलेल्या प्रपत्रात सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), अल्पसंख्याकासाठी संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते, आदी प्रमाणपत्र प्रवेशासाठी आवश्यक असणार आहे.