खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:47 IST2019-08-07T23:47:00+5:302019-08-07T23:47:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथील एकावर कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत असताना वाचविण्यासाठी आलेल्याचाच ...

खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथील एकावर कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत असताना वाचविण्यासाठी आलेल्याचाच खून केला. या गुन्ह्यातील आरोपीस येथील जिल्हा सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा बुधवारी सुनावली.
वडगाव बुद्रूक येथे १७ आॅगस्ट २०१८ रोजी दशरथ हसरत भिल हा दुपारी घरी जेवण करीत असताना मंगल धनसिंग गायकवाड तेथे आला. त्याने दशरथ भिल याच्या पत्नीचा हात धरला. दशरथचे लक्ष गेल्यावर त्याने हात सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंगल याने दशरथचा गळा दाबून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दशरथने स्वत:ची सुटका करत पळ काढला. मात्र आरोपी मंगल याने घरातून कुºहाड आणून दशरथचा पाठलाग केला.
दशरथ गावातील एका मंदिरामागे लपला होता. तेव्हा मंदिरावर बसलेल्या रामदास हसरत भिल यांनी त्यास विचारले की, तू कोणाच्या मागे पळत आहेस, याचा राग आल्याने मंगलने त्याच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रामदासचे सासरे गणेश सुका भिल हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता मंगलने त्यांनाही झोपडीत ढकलून दिले. तसेच तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून मानेवर, डोक्यावर कुºहाडीने वार केले. त्यामुळे गणेश भिल जागीच ठार झाले. नंतर ग्रामस्थांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दशरथ भिल याच्या फिर्यादीवरून आरोपी मंगल विरुद्ध खून व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.
दरम्यान, सरकारी वकील किशोर बागुल यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. मात्र न्या. राजीव पांडे यांनी मीना भिल, रामदास भिल, गणेशची पत्नी मालू भिल व रुग्णालयाचे डॉ.विष्णू दायमा यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी मंगल यास विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व ३ हजार रुपये दंड, तो न भरल्यास १ वर्ष शिक्षा, कलम ३०७ नुसार ५ वर्षे शिक्षा, २ हजार रुपये दंड व तो न भरल्यास ६ महिने शिक्षा, तसेच कलम ३५४ प्रमाणे दीड वर्षे शिक्षा व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून भामरे तर केसवॉच म्हणून महेश रामराव पाटील यांनी काम पाहिले.