जीवरक्षक दलातील सदस्यांच्या तत्परतेने वाचले गणेशभक्ताचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:46+5:302021-09-21T04:19:46+5:30
भुसावळ : गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... अशा गजरात गणरायाला निरोप देत असताना तापी नदीपात्रात ...

जीवरक्षक दलातील सदस्यांच्या तत्परतेने वाचले गणेशभक्ताचे प्राण
भुसावळ : गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... अशा गजरात गणरायाला निरोप देत असताना तापी नदीपात्रात यावल हद्दीत गणेशभक्ताचा पाय घसरून तो तापी नदीत बुडत असताना हद्दीच्या वादात न पडता माणुसकीचे दर्शन घडवत जीवरक्षक पथकाने बोट घेऊन धाव घेतली व क्षणात त्या गणेशभक्तांचे प्राण वाचविले.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार विसर्जन करताना अनुचित घटना घडू नये, याकरिता भुसावळ तापी नदीपात्रात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिह रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथक तापी पात्रावर सज्ज होते.
गणपती विसर्जनाच्या वेळेस भूषण प्रभाकर इंगळे (३५) रा. गोदावरी कॉलनी हा रेल्वे कर्मचारी तापी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन करत असताना पाय घसरून पाण्यात बुडत असताना जीव रक्षकांनी तातडीने पाण्यात उडी घेऊन, ट्यूब घेऊन त्याचे प्राण वाचविले. सुरेंद्र भोसले व बंधू रा. टिंबर मार्केट या महाकाल मंडळाच्या सदस्यांनी त्याची मदत केली.
पथकात सामील असलेले वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सतीश कांबळे, स्कायलेब डिसुजा, चेतन बोरणारे, मेनूल फर्नाडिस, आशिष अलोटकर, एलेंन मेसन यांनी कर्तव्य बजावले.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पालिकेचे अकाउंट सुदर्शन शमनानी, वैभव पवार यांनी त्या व्यक्तीची विचारपूस करून त्यास मानसिक आधार देत, पालिका रुग्णालयात उपचारार्थ पाठवले.
भुसावळ-यावल हद्द बाजूला ठेवत माणुसकीच्या हद्दीचे घडविले दर्शन
-शेकडो भक्तगणांना केले अन्नदान, नगरसेवक निर्मल कोठारी यांचा उपक्रम
भुसावळ : लाडक्या बाप्पाला भक्तगण निरोप देत असताना यावल रोडवर नगरसेवक निर्मल कोठारी व साई मित्र परिवार यांच्याकडून भक्तगणांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाचा जवळपास दहा हजारपेक्षा जास्त भक्तगणांनी लाभ घेतला. सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता.
भक्तगणांना अन्नदान करताना नगरसेवक निर्मल कोठारी व साई मित्र परिवाराचे सदस्य.